मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात

By जितेंद्र कालेकर | Published: May 17, 2021 11:18 PM2021-05-17T23:18:16+5:302021-05-17T23:21:37+5:30

मुंबईतील फिल्म अकादमीद्वारे अभिनय आणि गाणे गाण्याची कला शिकण्याच्या जिद्दीने उत्तरप्रदेशातून रेल्वेने पळालेल्या एका १७ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांमध्ये सुखरुप तिच्या पालकांकडे सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आल्याची घटना रविवारी घडली. या मुलीला सोमवारी तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

A minor girl who ran away from UP to work in a film in Mumbai was found in Thane | मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात

पालकांनी केली होती रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार

Next
ठळक मुद्दे ठाणे रेल्वे पोलिसांची सतर्कतापालकांनी केली होती रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबईतील फिल्म अकादमीद्वारे अभिनय आणि गाणे गाण्याची कला शिकण्याच्या जिद्दीने उत्तरप्रदेशातून रेल्वेने पळालेल्या एका १७ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांमध्ये सुखरुप तिच्या पालकांकडे सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आल्याची घटना रविवारी घडली. या मुलीला सोमवारी तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर थेट रेल्वे मंत्र्यांकडे आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे तिच्या पालकांनी तक्रार केली होती.
उत्तरप्रदेशातील बलिया जिल्हयातील महू रेल्वे स्थानक येथून एक १७ वर्षीय मुलगी १५ मे २०२१ रोजी कुठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यासह रेल्वे मदत केंद्र तसेच रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. परंतू, ती बेपत्ता झाल्याची तक्रार २४ तासांनी नोंदवून घेण्यात येईल, असेही तिच्या पालकांना सांगण्यात आले होते. तोपर्यंत तिच्या पालकांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागितली. या मुलीने घरी सोडलेल्या एका पत्राच्या आधारे ती मुंबईत चित्रपटात अ‍ॅक्टींग आणि गाण्याची कला शिकण्यासाठी एका फिल्म अकादामीत प्रवेश घेण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली होती. ती छपरा एक्सपे्रसने १६ मे रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास ठाण्याकडे येणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वे मदत केंद्रातून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मिळाली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक पी. बी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नविन सिंह, सोनाली मलैया आणि हवालदार रोशनी साहू आदींच्या पथकाने दुपारी २.४० वाजता फलाट क्रमांक आठवर आलेली छपरा एक्सप्रेसची कसून तपासणी केली. तेंव्हा महिलांच्या डब्यात ही संशयास्पद मुलगी आढळली. महू रेल्वे स्टेशन येथील तिचे छायाचित्र, पालकांकडून मिळालेले ओळखपत्र आणि सीसीटीव्हीतील फूटेजच्या आधारे तिची ओळख पटविण्यात आली. त्याच आधारे तिच्या पालकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधण्यात आला. तेंव्हा बेपत्ता झालेली हीच ती मुलगी असल्याची बाब समोर आली. चित्रपटासाठी अभिनय आणि गाणे गाण्याच्या छंदाला कुटूंबीयांनी विरोध दर्शविल्यामुळेच आपण घर सोडल्याचे तिने पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर सांगितले. मुलीच्या आईने संमती दिल्यानंतर मुंबईतील मालाड येथील एका नातेवाईकांकडे तिला रविवारी आरपीएफच्या पथकाने सुपूर्द केले. ठाणे आरपीएफने तत्परता दाखवून या मुलीला वेळीच तिच्या पालकांकडे सुखरुप सुपूर्द केल्याबद्दल या कुटूंबीयांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत. सोमवारी तिच्या नातेवाईकांनी तिला तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द केले.

Web Title: A minor girl who ran away from UP to work in a film in Mumbai was found in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.