अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:39+5:302021-06-30T04:25:39+5:30

स्टार 843 (टेम्प्लेट) प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कौटुंबिक वाद, नैराश्य यात अनेक जण घर सोडतात. शिक्षणाचा ...

Minor girls ‘locked’; Disappearance rates down! | अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले !

अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले !

Next

स्टार 843 (टेम्प्लेट)

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कौटुंबिक वाद, नैराश्य यात अनेक जण घर सोडतात. शिक्षणाचा त्रास असो अथवा कौटुंबिक त्रास यात अल्पवयीन मुले घरातून पळून जातात. अल्पवयीन मुलींना पळविताना भूलथापा तसेच लग्नाचे प्रलोभन दाखविले जाते. बेपत्ता होताच त्याची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात केली जाते. दरम्यान, अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांनी बेपत्ता होण्याच्या नोंदीऐवजी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. बेपत्ता अल्पवयीन मुलींचा साडेतीन वर्षांतील आढावा घेता २०१८, १९ मध्ये ही संख्या अधिक होती. परंतु, २०२०, २०२१ मे पर्यंत दीड वर्षांत मात्र ही संख्या घटली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन आणि निर्बंधांमध्ये मुली घरातच ‘लॉक’ झाल्याने बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पहिल्या लाटेपासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये अजूनही उघडलेली नाहीत. या कालावधीत लॉकडाऊन, निर्बंध आणि संचारबंदी लागू असल्याने अल्पवयीन मुली घरातच होत्या. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत दीड वर्षांत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, बेपत्ता होणे किंवा प्रेमप्रकरणातून घरातून निघून जाणे असल्या तक्रारींना काहीअंशी चाप बसल्याचे एकंदरीत आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

२०२०ला बेपत्ता झाल्याच्या ९४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील ३९ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, २०२१ मधील मे महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहता अशा ५३ तक्रारींची नोंद आहे. आतापर्यंत यातील ४६ मुलींचा शोध लावून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

-------------------

६३ मुलींचा शोध लागेना

अनेकदा अल्पवयीन मुली घरातील भांडणाच्या रागातून घर सोडतात. सुरुवातीला आजूबाजूला तसेच तिच्या मैत्रिणींकडे तसेच परिचितांकडे शोधाशोध केला जातो. परंतु, तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्यास पालक पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार करतात. अशा मुलींचा शोध कालांतराने लागतो. मात्र, प्रेमप्रकरणातून जर मुलगी पळून गेली असेल तर आणि ती स्वमर्जीने परराज्यात गेल्यास तिचा शोध घेणे पोलिसांना कठीण जाते. २०२० मध्ये दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारींपैकी ५६ मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही, तर २०२१ मधील आढावा घेता मेपर्यंत दाखल झालेल्या तक्रारींनुसार ५३ पैकी ४६ मुलींचा शोध लागला असून, सात मुली आजही बेपत्ता आहेत.

-------------------

शोधकार्यात अडचणी काय?

- जर एखादी मुलगी बेपत्ता झाली असेल तर त्याबाबत तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली जात नाही. उशिराने तक्रार दाखल झाल्यावर मुलीचा तपास करताना अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागतो.

- अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यावर तिच्या नातेवाइकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत नाही. यामुळेही शोध कार्यात अडथळे येतात.

- मुली पळून गेल्यानंतर त्या आपल्या मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर येते. मुलगी नेमकी कोणासोबत गेली याची पुरेशी माहिती काही वेळेला पालकांकडे नसते परिणामी हीदेखील अडचण तपास यंत्रणेपुढे येते.

------------------------------------------------

पालकांनी ठेवावी देखरेख

ज्या तक्रारी दाखल होतात यात बहुतांश प्रेम प्रकरण आणि भांडणातून घरातून निघून जाणे असे प्रकारच जास्त असतात. सध्याच्या मोबाइलच्या युगात मुलगी अल्पवयीन असो अथवा सज्ञान, त्यांच्यावर पालकांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्याशी वारंवार संवाद साधणे गरजेचे आहे. तिचे मित्र नेमके कोण आहेत, तिचा कोणाशी संपर्क जास्त वेळ येत आहे, याचीदेखील माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

--------------------------------------------------

अल्पवयीन मुली बेपत्ता

२०१८- १५७

२०१९ - १३८

२०२० -९४

२०२१ मेपर्यंत ५३

---------------

Web Title: Minor girls ‘locked’; Disappearance rates down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.