अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:53 AM2018-03-29T00:53:41+5:302018-03-29T00:53:41+5:30
उच्चभ्रू गृहसंकुलातील रहिवाशांकडून कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून १२ वर्षांच्या मुलीने आत्महत्येचा
कल्याण : उच्चभ्रू गृहसंकुलातील रहिवाशांकडून कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून १२ वर्षांच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पश्चिमेत घडली आहे. या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे सोसायटीतील काही महिलांनी या मुलीच्या वडिलांवर छेडछाड करत असल्याचा आरोप करत खडकपाडा पोलिसात तक्रार दिली आहे.
आधारवाडी परिसरात साकेत पॅरेडाइज सोसायटीत एक कुटुंब काही वर्षांपासून राहत आहे. त्यांच्या मुलीने सोमवारी सायंकाळी विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या मुलीचा आरोप आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही महिला टोमणे मारून तिचा मानसिक छळ करत आहेत. याप्रकरणी तिचे वडील म्हणाले की, सोसायटीतील गैरप्रकार मी इतर सदस्यांपुढे मांडत असतो. याच कारणांमुळे काही दिवसांपासून माझ्या मुलीला काही महिला मानसिक त्रास देत होत्या. यासंदर्भात मी आणि माझ्या मुलीने खडकपाडा पोलिसात तक्रार दिली होती. याच रागापोटी सोसायटीमधील काही महिलांनी माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई करून मला तसेच माझ्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. सोसायटीचे सचिव भागवत पाटील म्हणाले, ‘घडलेल्या प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत. त्यानंतरच सत्य समोर येईल.’