दहा महिने होऊनही मिनीट्रेन बंदच...
By admin | Published: February 16, 2017 02:07 AM2017-02-16T02:07:51+5:302017-02-16T02:07:51+5:30
माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन तांत्रिक अडचणीचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केली, आज याला दहा महिने होत
मुकुंद रांजणे / माथेरान
माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेन तांत्रिक अडचणीचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केली, आज याला दहा महिने होत आलेत. मागील वर्षी ८ मेला रेल्वे घसरल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. तेव्हा रेल्वे सेवा पूर्ववत व्हावी यासाठी माथेरानकरांनी मोठे आंदोलन केले. मात्र ऐन पर्यटन हंगामामध्ये रेल्वे सेवा बंद झाली. पर्यटकांपर्यंत ही बाब जाण्यास उशीर झाला त्यामुळे मागील वर्षी पर्यटनावर त्याचा फार मोठा परिणाम दिसून आला नाही. जसजसा काळ पुढे चालला आहे तसतसा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
माथेरान हे प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेणाऱ्या मिनीट्रेनचे फार मोठे आकर्षण आहे. आपल्या शालेय जीवनात घेतलेला मिनीट्रेनचा थरारक अनुभव आपल्या बच्चे कंपनीनेही घ्यावा अशी येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते, त्यामुळे येथील मिनीट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटन व्यवसायास भरभराट आली होती. मात्र रेल्वे प्रशासन तोट्यात चालणारी सेवा म्हणून कायम या मार्गाला दुर्लक्षित करीत राहिले. यामुळेच येथील मार्गावर चालणारी इंजिने व बोगी डबघाईला आली त्याचा परिणाम येथील सेवेवर होऊन गाडी बंद पाडण्याचे प्रमाण वाढू लागले. इंजिनाची क्षमता नसतानाही त्यांना गाड्यांना जोडून प्रवास सुरू होता. हे सत्र जवळजवळ दोन वर्षे सुरु होते, या काळात कोणतेही नवीन इंजिन माथेरानच्या ताफ्यात समाविष्ट केले गेले नाही, त्यामुळे इंजिनाची क्षमता संपून गाडी घसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली.
वॉटरपाइप स्टेशन ते माथेरान दरम्यानच्या मार्गावर अजूनही खूप कामे बाकी आहेत. मधल्या भागातील काही रेल्वे रूळसुध्दा जमिनीखाली बुजले गेले आहेत. अमनलॉज ते माथेरान हे
रूळ काढून त्याचा फक्त सांगाडाच शिल्लक ठेवलेला आहे. माथेरान स्थानक मोकाट गुरांचा अड्डाच बनलेला आहे. सर्वत्र धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळेच माथेरानची मिनीट्रेन लवकरच सुरू करणार या रेल्वे प्रशासनाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याची विचारणा स्थानिकांकडून होत आहे. रेल्वेने चाचणी सुरू केल्याचा देखावा देखील केलेला आहे. अपघात क्षेत्र माथेरानमध्ये आणि चाचणी नेरळमध्ये असा विरोधाभास सुरू आहे. पावसाळ्यात डागडुगीसाठी मिनीट्रेन दरवर्षी बंद असते, मात्र यावर्षी आधीच बंद होऊनदेखील डागडुगी मात्र बंदच होती. त्यामुळेच या हंगामामध्ये तरी ही सेवा सुरू होणार का असा प्रश्न माथेरानकरांना पडला आहे. जर या हंगामापूर्वी रेल्वे सुरू झाली नाही तर त्याचा फटका येथील पर्यटन हंगामावर निश्चित होणार असून उपासमारीचे संकट ओढावणार आहे.