मीरा-भार्इंदरमध्ये गरब्याचा दणदणाट; नियम धाब्यावर : पोलिसांचेही दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 02:04 AM2018-10-13T02:04:04+5:302018-10-13T02:07:48+5:30
गरबा, दांडियासाठी ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी रात्री १० च्या वेळेची मर्यादा असताना मीरा भार्इंदरमध्ये मात्र रात्री ११ वाजले तरी दणदणाट सुरू असतो.
मीरा रोड : गरबा, दांडियासाठी ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी रात्री १० च्या वेळेची मर्यादा असताना मीरा भार्इंदरमध्ये मात्र रात्री ११ वाजले तरी दणदणाट सुरू असतो. उघडपणे ध्वनी प्रदूषण कायद्यासह उच्च न्यायालयाच्या आदेशांवर आयोजकांकडून आवाज वाढवला जात आहे. पोलिसांनीच ध्वनीप्रदूषण करण्यासाठी रात्री ११ ची वेळ तडजोडीत दिली असून काही ठिकाणी तर तक्रार येणार नाही याची काळजी घ्या असे सल्लेही दिल्याचे समजते. निवासी, रूग्णालय क्षेत्रात आवाजाची मर्यादा सर्रास ओलांडली जात असताना सामान्य नागरिकांना मात्र मुकाट्याने हा त्रास सहन करावा लागत आहे.
पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता यंदा शहरात गरबा - दांडियावर राजकीय रंग चढला आहे. राजकारणी व लोकप्रतिनिधींमध्ये तर गरब्यासाठी वेगवेगळे गायक व कलाकार आणणे, बक्षिसं यात स्पर्धाच लागली आहे. वाद्यवृंद,डीजेसारख्या कानठळ्या बसवणाºया ध्वनीयंत्रणांचा दणदणाट चालला आहे. कानठळ्या बसवणाºया आवाजामुळे नागरिक त्रासले आहेत. रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक बंद होईल अशी त्यांची आशाही फोल ठरली आहे. या विरोधात तक्रार केल्यास पोलिसांकडून आयोजकांना नाव सांगितले जाण्याची भीती व पुन्हा त्यांचा दबाव या धास्तीने सामान्य नागरिक तक्रार करण्यास धजावत नाहीत.
काही ठिकाणी तर उशिरापर्यंत दणदणाट सुरू असतो. पोलिसांनी स्वत:हून गस्त घालून रात्री दहानंतर ध्वनिप्रदूषण करणाºया ध्वनिक्षेपक वा ध्वनीयंत्रणांसह आयोजकांवर कारवाईची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
नवरात्रीच्या नावाखाली चालणारा हा उत्सव धार्मिक राहिलेला नाही. त्याचे पावित्र्य उरलेले नाही हे वास्तव आहे. त्यामुळे रात्री दहानंतर सर्रास नियमांचे उल्लंघन करून चालणारे ध्वनीप्रदूषण हे पोलिसांनी स्वत:हून रोखले पाहिजे. तक्रार करण्यास बहुतांश नागरिक घाबरतात.
- अनंत आंगचेकर, ज्येष्ठ नागरिक