मीरा-भार्इंदर : भुयारी गटार योजनेच्या अपहाराची चौकशी
By admin | Published: December 7, 2015 01:05 AM2015-12-07T01:05:45+5:302015-12-07T01:05:45+5:30
मीरा-भार्इंदर महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी ११ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामात अपहार झाल्याप्रकरणी ११ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव सं.श. गोखले यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिले आहेत. कामे अपूर्णावस्थेत असतानाही ९५ टक्के रक्कम कंत्राटदाराला अदा केली आहे.
केंद्र शासनाने जेएनएनयूआरएमअंतर्गत मीरा-भार्इंदर शहरांत भुयारी गटार योजनेसाठी डिसेंबर २००७ मध्ये ३३१ कोटी ४२ लाख रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली होती. परंतु, फेब्रुवारी २००९ मध्ये याच योजनेसाठी प्रशासनाने सादर केलेल्या ४९१ कोटी ९८ लाख रु पयांच्या निविदेस महासभेने मंजुरी देत सुभाष प्रोजेक्ट्स या (एसपीएमएल) ठेकेदारास कंत्राट देण्यात आले. तीन वर्षांत काम पूर्ण करायचे असताना आजही शहरातील भार्इंदर पूर्व व भार्इंदर पश्चिम भागातील भूमिगत गटार योजनेचे बहुतांशी काम झालेले नाही. योजनेचे काम अपूर्ण असतानादेखील ठेकेदारास तब्बल ९५ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक आसीफ शेख यांनी नगरविकास विभागाकडे केली होती.
सदर योजना मंजूर करताना राज्य व केंद्र सरकारच्या समित्या तसेच आयआयटीला शहराची माती दलदलीची आहे? खोदकाम जास्त करावे लागेल, इत्यादी बाबी लक्षात आल्या नाहीत. त्या फक्त ठेकेदाराला कळल्या, असा खोचक सवालदेखील शेख यांनी केला आहे. ठेकेदाराने परस्पर उपठेकेदारदेखील नेमले असून एकूणच या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आर्थिक नुकसान करणाऱ्या दोषी ठेकेदार व महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.