हरीत मिरा भार्इंदरच्या वल्गना पोकळच, रोपांच्या संरक्षणासाठी लावलेल्या पिंज-यांची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 07:04 PM2018-05-25T19:04:31+5:302018-05-25T19:04:31+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे.
मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे. परंतु या कडे पालिका व लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्याचे दिसत आहे. वृक्षा रोपणाच्या नावाखाली केले जाणारे काही कोटी रुपयांचा खर्च या अशा प्रकारां मुळे फुकट जात असुन वृक्षांची वाढ होत नसल्याने हरीत मीरा भार्इंदरच्या केवळ भुलथापा ठरल्या आहेत.
पावसाळा येणार त्या आधी महापालिकेने वृक्षा रोपणाची जोरदार तयारी केली आहे. रोपांची लागवड करताना महापौर, आमदार आदी पदाधिकारी , नगरसेवक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी रोपांची लागवड करताना आवर्जुन छायाचित्र काढुन सोशल मिडीयावर कौतुक करुन घेत असतात.
परंतु नंतर मात्र लावलेली रोपं, त्याच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पिंजरे , रोपांना नियमीत पाणी व खत मिळतंय की नाही, रोपं जगली की नाही आदी बाबींकडे ढुंकुनही कोणी बघत नाहीत. परिणामी रोपं व पिंजरे भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पडुन राहण्याच्या प्रकारा पासुन ठिकठिकांणी पिंजरे नसणे वा ते काढून नेणे, पाणी - खत नसल्याने रोपं सुकुन मरुन जाणे या सारखे प्रकार जागोजागी दिसुन येतात.
भार्इंदर पुर्वेच्या इंद्रलोक - न्यु गोल्डन नेस्ट मार्गावर तर पालिका व लोकप्रतिनिधींनी मोठ्या दिमाखात लावलेल्या रोपांची व संरक्षण पिंजरयांची दुरावस्था झालेली आहे.
पालिकेच्या ठेकेदाराच्या कचरयाच्या गाड्या वा अन्य वाहनं उभी करताना सर्रास या पिंजरयांची मोडतोड केली आहे. काही पिंजरे तर खाली पडले आहेत. पिंजरयांची मोडतोड झाली आहेच शिावाय यातील रोपांची सुध्दा हानी झालेली आहे. काही रोपं तर सुकुन गेली आहेत.
वास्तविक महापालिकेने लावलेली रोपं, संरक्षित पिंजरे यांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची आहेच. पण त्याच सोबत नगरसेवक, आमदार यांच्या सह राजकिय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सुध्दा आहे. परंतु वृक्षा रोपणा वेळी चमकोगीरी करणारी ही मंडळी राजरोसपणे होणारया पिंजरयांची मोडतोड व सुकणारया रोपां कडे मात्र ढुंकुनही पाहताना दिसत नाही.
डॉ. संभाजी पानपट्टे ( उपायुक्त ) - त्वरीत अधिकारी पाठवुन माहिती घेऊ. रोपं व पिंजरयांचे झालेले नुकसान प्रकरणी कारवाई केली जाईल.