मीरा-भार्इंदरमध्ये खड्डे दुरुस्तीचा रात्रीस खेळ चाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 04:47 PM2017-10-08T16:47:25+5:302017-10-08T16:47:39+5:30
मीरा-भार्इंदरमधील रस्त्यांवर पडलेल्या असंख्य खड्यांची दुरुस्ती दिवसाढवळ्या शास्त्रोक्त पद्धतीने सुरू केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना काही ठिकाणच्या खड्ड्यांची दुरुस्ती मात्र रात्रीच्या अंधारात सुरू केली
राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदरमधील रस्त्यांवर पडलेल्या असंख्य खड्यांची दुरुस्ती दिवसाढवळ्या शास्त्रोक्त पद्धतीने सुरू केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना काही ठिकाणच्या खड्ड्यांची दुरुस्ती मात्र रात्रीच्या अंधारात सुरू केली. परंतु खड्ड्यांच्या दर्जाहिन दुरुस्तीचा रात्रीस खेळ चाले, अशी उपहासात्मक टीका नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्याचे बांधकाम दर्जेदार होत नसल्यानेच ते अल्पावधीत उखडून त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. असा प्रकार अनेकदा चव्हाट्यावर आला असून, काही राजकीय नेत्यांनी तर रंगेहाथ त्याची पोलखोल करून रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या पोलखोलीमुळे दर्जेदार साहित्याचाच वापर करण्यास प्रशासनाला भाग पाडण्यात आले. परंतु ही मोहीम काही काळापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. कंत्राटदाराशी टक्केवारीची भागीदारी करून जनतेच्या पैशावर ताव मारण्याची प्रथा येथे पूर्वापार चालत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी कोणत्याही आयुक्ताने अद्याप कठोर पावले उचलली नाहीत. केवळ शास्त्रोक्त पद्धतीने रस्ते व खड्डे दुरुस्ती व्हावीत, यासाठी प्रयत्न केले जात असले तरी मागच्या दाराने पुन्हा जैसे थे प्रकार सुरू केला जातो. यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य शहराच्या पाचवीलाच पुजल्याचा आरोप सतत केला जात आहे. गेल्या गणेशोत्सवापुर्वी शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्याच्या राजकीय मागणीनुसार काही रस्त्यांची दुरुस्ती मोहिम सुरु करण्यात आली. तर उर्वरीत जैसे थे ठेवण्यात आले. त्यातच रस्ते दुरुस्तीत वाटमारी होत असल्याचा प्रकार आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर रस्ते दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला शास्त्रोक्त पद्धत अवगत झाली.
या दिवसाढवळ्या खड्डे दुरुस्तीतील वाटमारी चव्हाट्यावर येत असल्याने त्याची दुरुस्ती रात्रीच्या अंधारात सुरु करण्यात आल्याचे समोर आले आहे. खड्यांत थेट रासायनिक पातळ द्रव टाकून त्यावर डांबरयुक्त खडी टाकली जाते. त्याचे सपाटीकरण करुन खड्यांच्या दुरुस्तीचे सोपस्कार रात्रीच्या अंधारात उरकले जात असल्याचा आरोप नागरीकांकडुन होऊ लागला आहे. यावर प्रशासनाने मात्र वाहतुक कोंडीचा मुद्दा पुढे करुन वाहतुकीला अडथळा नको म्हणुनच रात्रीच्या वेळी खड्डे दुरुस्ती केली जात असल्याचा दावा केला आहे. तसेच खड्डे दुरुस्तीही शास्त्रोक्त पद्धतीनेच केली जात असल्याचाही दावा केला जात असला तरी तो खोडुन काढत हि करदात्यांच्या डोळ्यात धूळफेक चालविल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जनतेच्या पैशाचा वापर दर्जेदार कामासाठी करुन पालिकेने अपारदर्शक नव्हे तर पारदर्शक कारभार करावा, असा टोला देखील नागरिकांनी प्रशासनाला लगावला आहे.