मीरा-भार्इंदरमध्ये उद्यान, वृक्ष प्राधिकरणात अधिकारांची चढाओढ
By admin | Published: February 14, 2017 02:48 AM2017-02-14T02:48:01+5:302017-02-14T02:48:01+5:30
उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील कामकाज विभागून देण्याचा आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा आदेश ते प्रशिक्षणासाठी रजेवर जाताच त्यांचा
मीरा रोड : उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील कामकाज विभागून देण्याचा आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा आदेश ते प्रशिक्षणासाठी रजेवर जाताच त्यांचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सतीश लोखंडे यांनी रद्द करुन टाकला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लोखंडे यांनी गीतेंचा आदेश रद्द करताना एका अधिकाऱ्याला दुसऱ्याच्या हद्दीतली दोन आरक्षणेही बहाल केली. यातून दोन्ही अधिकाऱ्यांतील कुरघोडीच्या राजकारणावर पालिकेत खुमासदार चर्चा रंगली आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३८ कोटींची तरतूद असलेल्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागात नागेश वीरकर व हंसराज मेश्राम हे दोन उद्यान अधिक्षक आहेत. पदोन्नती मिळवण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या विभागांतर्गत शहरातील ७३ उद्याने, १४ स्मशानभूमी, ११ मैदाने, सुमारे २२ किमीचे रस्ते दुभाजक व चौक यांचा समावेश आहे. शिवाय झाडांची लागवड, त्याचे जतन, धोकादायक झाडे तोडणे, नवीन विकासकामादरम्यान झाडे लावण्याची परवानगी देणे आदी कामे या विभागामार्फत केली जातात.
या आधी हा विभाग उपायुक्तांकडे होता. त्यांच्याकडून तो काढून घेत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याकडे सोपवण्यात आला. मेश्राम यांना मीरा रोड-काशिमीरा भागातील प्रभाग समिती ५ व ६, तर वीरकर यांना भार्इंदर-उत्तन भागातील प्रभाग समिती १ ते ४ अशी कामांची हद्द विभागून देण्यात आली होती.
१७ डिसेंबरला आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामकाजाची विभागणी करुन दोन्ही अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यभार दिला. त्यात मेश्राम यांच्याकडे मोठी आर्थिक तरतूद असलेला उद्यान विभाग देण्यात आला. यात उद्याने, स्मशानभूमी, मैदाने, रस्ता दुभाजक आदींचा समावेश केला गेला, तर वीरकर यांना वृक्षप्राधिकरण विभागाचा कार्यभार दिला. त्यात झाडांची लागवड-जतन, धोकादायक झाडे काढणे, नवीन विकासकामा दरम्यान झाडे तोडणे व लावण्याची परवानगी देणे आदी कामे होती.
वास्तविक मीरा रोड व भार्इंदर अशी असलेली हद्दीची विभागणी तशी सोयीची होती. परंतु डॉ. गीते यांनी कामात सुसुत्रता आणत लवकर निर्णय व्हावे म्हणून काढलेल्या आदेशामुळे मेश्राम यांच्या हाती बहुतांश तरतुद आली.
डॉ. गीते हे प्रशिक्षणासाठी पश्चिम बंगाल येथे गेल्याने शासनाने १३ जाने.पासून त्यांना कार्यमुक्त केले. २४ फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण असल्याने शासनाने तोवर वसई-विरार मनपा आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे मीरा-भार्इंदरचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. (प्रतिनिधी)