मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

By admin | Published: April 10, 2017 05:36 AM2017-04-10T05:36:29+5:302017-04-10T05:36:29+5:30

मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला

Mira-Bhairinder gets 75 million additional water | मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

मीरा-भार्इंदरला ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणी

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोट्यातून मंजूर केलेला अतिरिक्त ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा १५ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे २००८ पासून नवीन नळजोडण्या बंद झाल्याने केवळ टँकरद्वारे तहान भागवणाऱ्या नवीन इमारतींतील रहिवाशांना नळाद्वारे पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडण्यांचे अर्ज गरजूंना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली.
शहराला २०१५ पूर्वी स्टेमद्वारे ८६ व एमआयडीसीद्वारे ३० असा एकूण ११६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत होता. हा पाणीपुरवठा वाढत्या शहरीकरणाला अपुरा ठरत होता. शहरात रोज नवनवीन इमारतींचे काम सुरू होत असल्याने लोकसंख्येत सतत वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या आज १२ लाखांवर गेली असून होणारा पाणीपुरवठा किमान दरडोईपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडे सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेत तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २०१२ मध्ये शहराला एमआयडीसी कोट्यातून १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला. त्यानंतर, सत्तेवर आलेल्या युती सरकारने या मंजूर पाण्यापैकी २०१६ मध्ये शहराच्या पाणीपुरवठ्यात तातडीने २० दशलक्ष लीटर पाण्याची वाढ केली. उर्वरित ८० दशलक्ष लीटर पाणी शहरात आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी आवश्यक ठरल्याने ती टाकण्याच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्या पथकाने ८० टक्कयांहून अधिक काम पूर्ण केल्याने शहराला लवकरच पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

युद्धपातळीवर काम सुरू
सध्या युद्धपातळीवर सुरू असलेले काम मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण करण्यात येणार आहे. त्याची चाचणी घेतल्यानंतर १५ मे पासून शहराला प्रत्यक्षात पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. पुरेशा पाण्याअभावी पालिकेने २००८ पासून नवीन नळजोडण्या देणे बंद केले होते.
शहरातील नवीन इमारतींतील रहिवाशांना केवळ टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. यंदा अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने त्या रहिवाशांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. त्यांना नवीन नळजोडणीद्वारे पाणी मिळणार आहे.

Web Title: Mira-Bhairinder gets 75 million additional water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.