मीरा-भार्इंदर महापौरपद - भाजपा नगरसेवकांचा मुक्काम आलिशान रिसॉर्टवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:33 AM2017-08-28T04:33:28+5:302017-08-28T04:34:10+5:30
मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे.
भाजपाच्याच एका नेत्यांने विरोधातील काही पक्षांशी संपर्क साधून काही नगरसेवकांना गैरहजर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण लागताच नगरसेवकांना रिसॉर्टवर हलवण्यात आले.
भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांची भावजय डिम्पल या महापौरपदाच्या, तर चंद्रकांत वैती हे उपमहापौरपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांची निवड निश्चित आहे.
घोडबंदर मार्गावरील काजुपाडा येथे एका आलिशान रिसॉर्टमध्ये या नगरसेवकांना ठेवण्यात आले आहे. सर्व नगरसेवकांना आधी पक्ष कार्यालयात बोलावण्यात आले होते. तेथून त्यांना आमदार मेहता यांच्या कुटुंबीयांच्या वरसावे येथील हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर नगरसेवकांना बसमधून फिरवत फिरवत पुन्हा काजुपाडा येथे रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले. नेमके कुठे नेले जाणार याची अनेकांना कल्पनाही नव्हती. या रिसॉर्टच्या ठिकाणी भाजपाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून नगरसेवकांच्या हालचालींवर पाळत ठेवल्याने अस्वस्थता आहे.
थेट पालिकेत येणार
सोमवारी दुपारी १२ वाजता मुख्यालयात निवडणूक असल्याने रिसॉर्टवरुन भाजपाच्या सर्व नगरसेवकांना थेट पालिकेत आणले जाईल. शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक मात्र शहरातच आहेत. त्यामुळे ते तेथून पालिकेत येतील.
डमींची माघारी
महापौरपदासाठी वंदना भावसार यांनी भाजपाच्या डमी म्हणून, तर शिवसेनेतर्फे अनिता पाटील यांनी अर्ज भरला. उपमहापौरपदासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून राकेश शहा यांनी, तर काँग्रेसच्या अनिल सावंत यांनी अर्ज भरला आहे. निवडणुकीपूर्वी भावसार व शहा अर्ज मागे घेतील.