मीरा-भार्इंदर महापालिका : बेकायदा बांधकामांवरून आयुक्त लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:13 AM2017-11-18T01:13:54+5:302017-11-18T01:14:06+5:30
मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासह विविध ६ मुद्यांवर थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांना लक्ष्य केले.
मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासह विविध ६ मुद्यांवर थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांना लक्ष्य केले. बेकायदा बांधकामप्रकरणी आयुक्तांसह संबंधित अधिकाºयांनी २५ ते ३० कोटी जमवल्याचा आरोप करत कारवाई होत नसल्याने सोमवारपासून पालिका कार्यालयात भाजपाचे आमदार, नगरसेवक उपस्थित राहणार नाहीत. कोणतीही सभा होणार नाही, असा इशारा दिला. महापौरांनी शुक्रवारी पत्रकार परिषद बोलवली होती. महापौरांनी आयुक्त हे मनमानी करतात. बेकायदा बांधकामांवर तक्रारी करूनही कारवाई करत नाहीत. भ्रष्ट अधिकाºयांना पाठीशी घालतात. कार्यालयात असूनही आयुक्त महासभेत, आढावा बैठकीत येत नाहीत, असे मुद्दे उपस्थित केले. बीएसयूपी योजनेतील बाधितांना वर्षभरापासून भाड्याची रक्कम मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही भाडे दिलेले नाही.
तक्रारी करूनही कारवाई होत नाही. आम्ही सहा महिन्यांपासून सांगत आहोत, असे आमदार मेहता म्हणाले. प्रभाग ६ मध्ये बेकायदा बांधकामे होत असून यातून सुमारे २५ ते ३० कोटींचा भ्रष्टाचार प्रभाग अधिकारी अविनाश जाधवांपासून थेट आयुक्तांपर्यंत झाल्याचा आरोप त्यांनी केला. आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे, असे ते म्हणाले. जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी किरण राठोड यांना शिवीगाळ केली, पण अजून आयुक्तांनी जाधवांवर कारवाई केलेली नाही. आयुक्तांची ही मस्ती सहन करणार नाही, असा इशारा मेहतांनी दिला.
महापौर व आमदारांनी आॅर्केस्ट्रा बार-लॉज तसेच बेकायदा फेरीवाले, पार्किंगविरोधात ठोस कारवाई पालिकेकडून होत नसतानाही याप्रकरणी मूग गिळून गप्प आहेत. त्यांच्या तक्रारीत कुठेही या समस्यांचा उल्लेख नव्हता.