मीरा-भार्इंदर महापालिकेकडून यंदा कंत्राटी सफाई कामगारांना विनाविलंब बोनस अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 07:45 PM2017-10-03T19:45:19+5:302017-10-03T19:46:03+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा १० दिवसांपुर्वी कंत्राटी कामगारांना एक महिन्याच्या पगाराप्रमाणेच दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेने पत्राद्वारे पालिकेकडे गेल्या महिन्यात केली होती. या एकाच पत्राची दखल घेत प्रशासनाने बोनस देण्यास विलंब न लावता त्यांना १५ दिवसाआधीच बोनस अदा केल्याने कामगारांकडून आनंद व्यक्त
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा १० दिवसांपुर्वी कंत्राटी कामगारांना एक महिन्याच्या पगाराप्रमाणेच दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेने पत्राद्वारे पालिकेकडे गेल्या महिन्यात केली होती. या एकाच पत्राची दखल घेत प्रशासनाने बोनस देण्यास विलंब न लावता त्यांना १५ दिवसाआधीच बोनस अदा केल्याने कामगारांकडून आनंद व्यक्त होत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
पालिकेत सुमारे २ हजार ३०० कंत्राटी सफाई कामगार कार्यरत असून या कामगारांना किमान वेतन प्राप्त करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. तब्बल ३ वर्षांच्या लढ्यानंतर कामगारांना किमान वेतनाचा लाभ देण्यात आला. तसेच गतवेळच्या दिवाळीचा बोनसही दिवाळीपुर्वी किमान १० दिवस आधी देण्याची मागणी संघटनेने प्रशासनाकडे करण्यात आली होती. परंतु, कामगारांना सततच्या मागणीनंतरही प्रशासनाने त्यांना ऐन दिवाळीतच बोनस अदा केला होता. यंदा मात्र प्रशासनाने १५ दिवसाआधीच अपेक्षित बोनस देऊन कामगारांना सुखद धक्का दिल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पुर्वी यंदाच्या दिवाळीचा बोनसही १० दिवस आधी देण्याची मागणी संघटनेने गेल्याच महिन्यात प्रशासनाकडे पत्राद्वारे केली होती. तसेच यंदाचा बोनस २६ दिवसांच्या पगाराप्रमाणेच अदा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाय््राांनी चर्चा देखील केली होती. त्यावेळी उपायुक्तांनी बोनस लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनावर आडेवेडे न घेता पालिकेने त्यांना दिवाळीच्या १५ दिवसाआधीच बोनस अदा केला. तसेच २६ दिवसाच्या पगाराप्रमाणे केलेली बोनसची मागणी देखील प्रशासनाने मान्य केल्याने कामगारांची यंदाची दिवाळी आनंदी ठरल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलिप गोतारणे यांनी दिली. पालिकेने केवळ कंत्राटी सफाई कामगारांना बोनस दिला असला तरी त्यातील उद्यान विभागाचे सुमारे २९० कंत्राटी कामगार, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी व पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयातील प्रत्येकी ३० कामगार, तेथीलच १५ सुरक्षा रक्षक आणि १०० लिंकवर्कर्सना प्रशासनाने अद्याप बोनसपासुन वंचित ठेवले आहे. त्यांनाही लवकरात लवकर बोनस देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडुन सुरु असल्याचे उपायुक्त डॉ. पानपट्टे यांनी सांगितले.