मीरा भार्इंदर पालिकेची बससेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल, सत्ताधारी भाजपा आमदाराच्या संघटनेनेच केला अचानक संप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 10:39 AM2017-12-23T10:39:09+5:302017-12-23T10:39:27+5:30
श्रमीक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचा-यांनी ऐन सुट्यांच्या दिवसात शुक्रवारी दुपारपासुन अचानक बंद सुरु केल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले
मीरारोड - श्रमीक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचा-यांनी ऐन सुट्यांच्या दिवसात शुक्रवारी दुपारपासुन अचानक बंद सुरु केल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले. उपक्रमाची आर्थिक तरतुदच संपली असताना देखील पालिका अधिका-यांनी काहीच हालचाली न केल्याने कर्मचा-यांना यंदा कमी वेतन मिळाल्याचे कारण आंदोलकांनी दिलंय.
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमात सद्या ३५ ते ४० बस धावत असुन १२ ते १३ बस मार्ग आहेत. नाताळ सण तोंडावर असुन शाळांना देखील सुट्या पडल्या आहेत. त्यातच शनिवारपासून सोमवारपर्यंत सलग तीन दिवस सुट्या असल्याने बँकादेखील बंद आहेत. त्यामुळे कामासाठी वा सहकुटुंब बाहेर पडलेल्या प्रवाशांची संख्या जास्त असते.
तोच कंत्राटी कामगारांना या महिन्यात कमी वेतन मिळाल्याने त्यांनी आमदार मेहतांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यापासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. अचानक बससेवा बंद झाल्याने कामावरुन परत फिरणा-या प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले.
याबाबत महापौर डिंपल मेहता यांच्या दालनात आमदार मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्यासोबत आयुक्त डॉ. नरेश गीते यांची बैठक झाली. त्यात मध्ये परिवहन उपक्रमाची आर्थिक तरतूद गेल्याच महिन्यात संपली असताना आवश्यक तरतुदीचे पुर्नविनीयोजनाचा प्रस्तावच परिवहन विभागाने दिला नाही.
सत्ताधारी म्हणून महासभेत आम्ही विषय घेतला असताना प्रशासनाने गोषवारा दिला नाही. महासभेत पुर्नविनीयोजनाचा ठराव करुन देखील पालिकेने त्यावर अंमलबजावणी केली नाही. जेणेकरुन पालिकेकडून परिवहन ठेकेदारास कमी पैसे मिळाल्याने कर्मचा-यांना देखील कमी पगार मिळाल्याचा मुद्दा आमदार मेहतांनी बैठकीत मांडल्याचे उपमहापौर वैती यांनी सांगितले.
आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपण उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हासाळ यांना तरतुदीसाठी प्रस्ताव दिल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी संताप व्यक्त केल्याचे वैती म्हणाले. परिवहन कर्मचा-यांवर सातत्याने अन्याय होत असल्यानेच आमदार मेहतांच्या नेतृत्वाखाली कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केल्याचे वैतींनी स्पष्ट केले.
दरम्यान पालिका अधिका-यांच्या कमालीच्या हलगर्जीपणाचा फटका शहरातील हजारो प्रवाशांसह कर्रचा-यांना देखील बसलाय. त्यातच सलग तीन दिवस बँका बंद असल्याने ठेकेदारास पैसे देऊन ते कर्मचा-यांना वाटप करणं अवघड असल्याने बंद करुन सत्ताधारयांनीच पालिकेची कोंडी केली आहे.
पण याचा फटका मात्र शहरातील हजारो नागरीकांना बसत आहे. विशेषत: उत्तन, चौक, मोर्वा, राई, मुर्धा, काशिमीरा, हाटकेश, कनकिया आदि भागातील प्रवाशांचे हाल झाले असुन त्यांना अव्वाच्या सव्वा भाडं रीक्षा चालकांना मोजावं लागत आहे.
ऑलवीस फॅरो ( प्रवाशी संघटना अध्यक्ष ) - आता नाताळचा सण आहे. या आधी दिवाळीत असाच अचानक संप केला होता. कर्मचा-यांना ७० टक्के वेतन मिळाले आहे. मग सत्ताधारी असुनही अचानक संप करुन सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस कशाला धरता.