मीरा-भार्इंदर पालिकेच्या नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रमात सेना-भाजपाचा गोंधळ
By admin | Published: May 1, 2017 12:24 AM2017-05-01T00:24:42+5:302017-05-01T00:24:42+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी
राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भार्इंदर, दि. 1 - मीरा-भार्इंदर महापालिकेला राज्य सरकारने मंजुर केलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यातील पहिल्या टप्प्यात नवीन नळजोडणी लोकार्पण कार्यक्रम पालिकेने रविवारी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासुन सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घातला. सततच्या घोषणाबाजीमुळे रंगलेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीष महाजनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले होते. परंतु, तो प्रत्यक्षात ८ वाजता सुरु झाला. दरम्यान सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कार्यक्रमात आपापल्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने भाजपाची संख्या कमी पडत असल्याचे दिसुन येत होते. मात्र त्यांची नारेबाजी काही केल्या थांबत नसल्याने सुरुवातीला उपमहापौर प्रवीण पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तरी देखील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी थांबत नसल्याने महापौर गीता जैन यांनी आवाहन केले. त्यालाही कार्यकर्त्यांनी दाद न दिल्याने भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता, गिरीष महाजन व्यासपीठावर आल्यानंतरही दोन्ही पक्षांची जोरदार नारेबाजी सुरुच राहिली. अखेर आ. नरेंद्र मेहता यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन केल्यानंतर ते शांत झाले. त्यानंतर आ. मेहता यांनी केलेल्या भाषणात युती सरकारऐवजी केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्रचे सरकार असल्याचा उल्लेख करुन आपणच करुन दाखवलंच्या उल्लेखावर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहुन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हरहर मोदी, घरघर मोदीची नारेबाजी सुरु केली. अखेर आ. प्रताप सरनाईक यांना व्यासपीठावरुन खाली उतरुन सेना कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. आ. मेहता यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सरनाईक यांनी केलेल्या भाषणात पाण्यासाठी आपणच विधानसभेत आवाज उठविला असुन तरीदेखील आम्ही श्रेयासाठी धडपडत नाही. सध्याचे सरकार आमच्याच पाठींब्यावर चालत असल्याची आठवण मेहता यांना करुन देत मेहता यांच्या नळजोडणी अर्ज वाटपाचा समाचार घेतला. त्यांनी नागरीकांना समाजकंटक व पाणीचोरांपासुन सावध राहण्याचा सल्ला देताच सरनाईक यांनी मेहता यांनाच टोमणा दिल्याचे गृहित धरुन भाजपाने पुन्हा गोधळ सुरु केला. अखेर सरनाईक यांनी ते विधान काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल केल्याचा खुलासा करुन गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न केला. या घोषणाबाजीमुळे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार असले तरी त्याची सुरुवात मीरा-भार्इंदरमधुनच होईल, असे भाकीत केले. हि बाब शहरासाठी भुषणावह नसल्याची खंतही व्यक्त केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूकपुर्वीच घोषणाबाजीला सुरुवात झाल्याचा टोला दोन्ही पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना लगावला. खा. संजय राऊत यांनी भाजपाच्या हरहर मोदीच्या नारेबाजीवर सामंजसचा डोस देत देशाचे पंतप्रधान असलेले मोदी यांना खालच्या स्तरावर आणू नका, त्यांना त्यांना देशाचे राजकारण करु द्या. त्यांची सध्या मीरा-भार्इंदर मध्ये नाही तर काश्मिरमध्ये गरज असल्याचा चिमटा काढला. तीन तासांहुन अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांची घोषणाबाजीच अधिक काळ सुरु होती.