मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुक - हीच का पारदर्शकता? भाजपाचे २१ नगरसेवक गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:44 AM2017-08-28T04:44:30+5:302017-08-28T04:44:56+5:30
मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ८१ उमेदवारांपैकी तब्बल २७ जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ८१ उमेदवारांपैकी तब्बल २७ जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. एकहाती सत्ता मिळवणाºया भाजपाच्या तब्बल २१ नगरसेवकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या ४ तर दोन पुरस्कृत नगरसेवकांसह एकूण १२ जागा जिंकणाºया काँग्रेसच्या २ नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत.
मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात गुन्हे दाखल असलेले २५ उमेदवार भाजपाने दिले होते. त्यापैकी तब्बल २१ उमेदवार निवडून आले. भाजपाचे दरोगा उर्फ पंकज पांडेवर तब्बल ६ गुन्हे दाखल आहेत. पांडेला तडीपार करण्याचा प्रस्तावही पोलिसांनी पाठवला होता. भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे, गणेश शेट्टी, अॅड. रवी व्यास यांच्यावर प्रत्येकी ४ गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे प्रभाग ३ मधील नगरसेवक गणेश शेट्टी यांच्यावर खंडणी, अनैतिक देहव्यापार आदी गंभीर गुन्हे दाखल असून त्यांचाही तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी पाठवला होता.
भाजपाच्या अशोक तिवारींवर ३ गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे ध्रूवकिशोर पाटील व अश्विन कासोदरिया यांच्यावर प्रत्येकी २ गुन्ह्यांची नोंद आहे. पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर कासोदरिया वर शालेय मुलीचा विनयभंग व बालअत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. प्रभाग १२ मधील उमेदवार अरविंद शेट्टी हे लेडीज बार - लॉजचे चालक असून त्यांच्यावर अनैतिक देहव्यापार ( पीटा ) खाली गुन्हा दाखल आहे. भाजपाचे हसमुख गेहलोत व मोहन म्हात्रे वर जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,५ खाली गुन्हा दाखल आहे. भाजपाने अशोक तिवारी व वर्षा भानुशाली या दोघांना लाच घेताना पकडलेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली. शिवाय ते निवडूनही आले आहेत.
भाजपाचे परशुराम म्हात्रे, प्रशांत दळवी, विनोद म्हात्रे, सचिन म्हात्रे, मुन्ना सिंह, मनोज दुबे, दिपीका अरोरा, दौलत गजरे, रिटा शाह यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्यावरही २००७ मधील खटला प्रलंबित आहे. शिवसेनेचे जयंतीलाल पाटील, राजू भोईर, तारा घरत, अनिता पाटील तर काँग्रेसच्या रुबिना शेख व काँग्रेस पुरस्कृत अमजद गफार शेख यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.
भाजपाच्या २१ पैकी तब्बल १४ नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. तर शिवसेनेच्या ४ पैकी २ व काँग्रेस पुरस्कृत १ नगरसेवकावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मात्र निवडणून येण्याची क्षमताच पाहिली जाते. त्यातही उमेदवारांवर गुन्हे दाखल असले तरी न्यायालयात सिध्द होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपीच असतात असा सोयीस्कर पवित्रा राजकारणी नेहमीच घेतात.