मीरा भार्इंदर : पालिकेतील सदस्य कर्मचारी-अधिका-यांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनाप्रणित कामगार सेनेची हॅल्पलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 11:25 AM2018-01-16T11:25:10+5:302018-01-16T11:27:08+5:30
लोकप्रतिनिधी, अधिकारी वा कोणा व्यक्तीकडून त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मदतीसाठी महापालिकेतील शिवसेनाप्रणित मीरा भार्इंदर कामगार सेनेच्या सदस्य असलेल्या अधिकारी - कर्मचा-यांकरीता टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे
मीरा रोड - लोकप्रतिनिधी, अधिकारी वा कोणा व्यक्तीकडून त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास तत्काळ मदतीसाठी महापालिकेतील शिवसेनाप्रणित मीरा भार्इंदर कामगार सेनेच्या सदस्य असलेल्या अधिकारी-कर्मचा-यांकरीता टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती सरचिटणीस सुलतान पटेल यांनी दिली आहे. कामगार सेनेच्या सदस्यांवर अवलंबले जाणारे दबावतंत्र मोडून काढू, असा इशारा त्यांनी दिलाय.
पालिकेत शिवसेना प्रणित कामगार संघटना ही पूर्वीपासून असली तरी येथे आधी शरद व रवी राव यांच्या म्युनिसिपल लेबर युनियनचे वर्चस्व होते. राव यांच्याकडून कर्मचारी-अधिकारी यांच्या विविध प्रश्न, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचा-यांनी रयतराज संघटना आणली. परंतु येथे देखील कर्मचा-यांना तसाच अनुभव आला. त्यातच सत्ताधारी भाजपा नेतृत्वाने स्वत:ची श्रमिक जनरल कामगार संघटना सुरू करत पालिकेतील कर्मचा-यांच्या पतपेढीवर ताबा मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण निवडणुकीत अन्य सर्व पक्ष व संघटनांनी पालिकेतील रयतराजच्या कर्मचा-यांच्या पॅनलला जाहीर पाठींबा देत भाजपा समर्थक पॅनलचा धुव्वा उडवला होता. त्या नंतर रयतराजच्या सदस्यांनी दबावतंत्राला प्रबळ विरोध करता यावा म्हणून शिवसेना प्रणित कामगार सेनेत प्रवेश केला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे कामगारसेनेचे मार्गदर्शक आहेत. तर धनेश पाटील अध्यक्ष, अरुण कदम कार्याध्यक्ष व गोविंद परब हे युनिट अध्यक्ष आहेत. दरम्यान सत्ताधारी भाजपा प्रणित संघटनेचे एकहाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी सेनेच्या सदस्य असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना आपल्या कडे ओढण्याचे प्रयत्न सुरुच होते. दमदाटीपासून बदली करणे, विभाग वाटपात भेदभाव आदी प्रकारच्या तक्रारी सेनेच्या संघटनेकडून सुरु झाल्या. वेळ पडल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.
शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या सदस्यांना विविध मार्गाने फोडण्याचे काम विरोधकांनी सुरूच ठेवले आहे. शिवाय पालिकेतील काही अधिकारीदेखील दबाव टाकत असतात. या मुळे कामगार सेनेच्या सदस्य कर्मचारी - अधिका-यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
दबावतंत्र मोडून काढण्यासाठी कामगार सेनेच्या युनिट पदाधिका-यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला आहे. सेनेच्या सदस्य कर्मचा-यांना कुणी नाहक त्रास दिला, अपशब्द वापरुन दबाव वा अन्याय केल्यास थेट ७७७७०३०२४४ या टोल फ्री क्रमांका वर संपर्क साधण्याचे आवाहन पटेल यांनी केले आहे.