मीरा-भार्इंदरकरांची प्रतीक्षा संपणार : भुयारीमार्ग पितृपक्षानंतर खुला; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री करणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:55 AM2017-09-09T02:55:19+5:302017-09-09T02:55:26+5:30
पूर्व व पश्चिमेला भुयारी वाहतूकमार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राजू काळे
भार्इंदर : पूर्व व पश्चिमेला भुयारी वाहतूकमार्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पितृपक्ष संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत लहान वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले. ‘लोकमत’ने गेली आठ वर्षे हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. आयुक्तांसह आ. नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी सोमवारी या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.
२००९ मध्ये महासभेने मंजुरी दिलेल्या भुयारी मार्गाला काही महिन्यांनंतर सुरुवात झाली. यामुळे पूर्व-पश्चिम येजा करणाºया वाहनांना उड्डाणपुलाखेरीज अन्य पर्याय उपलब्ध झाला. अनेक तांत्रिक अडचणींत सापडलेला हा भुयारी मार्ग तब्बल साडेसात वर्षांनंतर पूर्णत्वाला जात आहे. गेल्याच महिन्यात मार्गाचे काम पूर्ण झाले असले, तरी काही किरकोळ कामांचा निपटारा न झाल्याने अद्याप तो खुला करण्यात आलेला नाही. सुरुवातीला बॉक्स पुशिंग पद्धतीने हा मार्ग बांधण्याचे ठरल्याने जमिनीतील दलदल त्यासाठी अडचणीची ठरली. आयआयटी, मुंबईच्या निर्देशानंतर हा मार्ग मायक्रो टनेल ट्रेंचलेस पद्धतीने बांधण्यात आला आहे.
या मार्गाच्या सर्व बाजूंना सुमारे ५०० मिलिमीटर व्यासाचे लोखंडी पाइप बसवण्यात आले असून त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग भार्इंदर खाडीपासून सुमारे ५०० मीटर असला, तरी त्यातील दलदल व पाण्याच्या स्रोतांमुळे या मार्गात पाणी झिरपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तो नियोजनशून्य ठरणार की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, या मार्गाच्या पूर्णत्वासाठी पालिकेने सुमारे १२० कोटींहून अधिक निधी खर्च केला आहे. त्यामुळे हा पालिकेच्या निधीतून बांधण्यात आलेला एकमेव महागडा प्रकल्प असल्याचे बोलले जाते. एवढा निधी खर्च करूनही हा मार्ग अद्याप वाहनांसाठी खुला करण्यात आला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.