मीरा-भार्इंदरचे पाणी महागले; प्रतिहजार लीटर पाण्यासाठी १३ रुपये निवासी तर ५० रुपये व्यावसायिक दर मोजावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 08:22 PM2018-02-20T20:22:51+5:302018-02-20T20:23:02+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे निवासी दर १० रुपयांवरून १३ रुपये तर व्यावसायिक दर ४० रुपयांवरून ५० रुपये प्रति १ हजार लीटर पाण्यासाठी मोजावा लागणार आहे.
पालिकेला स्टेम कंपनीकडून ८६ व एमआयडीसीकडून ९० असा एकूण १७६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्याच्या देयकापोटी स्टेम व एमआयडीसीला प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याकरिता अनुक्रमे १० रुपये ९५ पैसे व ९ रुपये दर पालिकेला मोजावा लागतो. तसेच पाण्यासाठी रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व महावितरण कंपनीला पंपिंगच्या वीजपुरवठ्यासाठी लाखोंचा खर्च अदा करावा लागतो. यामुळे पालिकेला पाणीपट्टीतून गतवर्षी ६८ कोटी १७ लाख ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले असून, खर्च मात्र १६६ कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये इतका करण्यात आला आहे. यावरुन पाणीपट्टीद्वारे पालिकेला मिळणारे उत्पन्न त्यावर होणा-या खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने पालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागतो. पालिकेला प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्यासाठी एकूण १४ रुपये ५० पैसे खर्च येत असला तरी नागरिकांना मात्र १० रुपये दरानेच पाणी वितरीत केले जाते. यात पालिकेला साडेचार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने वर्षाकाठी त्यात कोट्यवधींचा निधी खर्ची घातला जातो. त्यातच पालिकेला एमएमआरडीएमार्फत ११८ व जलसंपदा विभागामार्फत १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सूर्या धरणातून मंजूर करण्यात आल्याने ही योजना एमएमआरडीएद्वारे राबविण्यात येणार आहे. ही योजना शहराच्या प्रवेशद्वारापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, योजना शहरांतर्गत पूर्ण करण्यासाठी पालिकेला मोठा निधी उभारावा लागणार असल्याने पालिकेचे उत्पन्न आवश्यक ठरले आहे. परिणामी वाढलेल्या उत्पन्नामुळे योजना पूर्णत्वावासाठी कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने पाणीपट्टीच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये प्रत्येकी १ हजार लीटर पाणीपुरवठ्यामागे वाढ करण्याचा ठराव भाजपाच्या गीता जैन यांनी मांडला मंगळवारच्या विशेष महासभेत मांडला. तत्पूर्वी १६ डिसेंबरच्या स्थायी समिती बैठकीत निवासी दरात २ व व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र महासभेत सत्ताधारी भाजपाने त्यात आणखी एक रुपयाची वाढ मंजूर केली तर व्यावसायिक दर जैसे थे ठेवला. त्यावर सेना व काँग्रेस या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. काँग्रेसचे अनिल सावंत यांनी पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने रितसर मांडलेला नसून तो सत्ताधा-यांकडून सादर करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला. तसेच पालिकेला मंजूर ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजनेतील २५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अद्याप शहराला मिळत नसतानाही सत्ताधा-यांची प्रस्तावित पाणी दरवाढ रद्द करण्यात यावी, असा ठराव मांडला. त्यावर महापौर डिंपल मेहता यांनी दोन्ही ठरावांवर मतदान घेत जैन यांचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.