मीरा-भार्इंदरला डेंग्यूचा विळखा
By admin | Published: November 10, 2015 12:40 AM2015-11-10T00:40:54+5:302015-11-10T00:40:54+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद झाली असली तरी सीरम एलायझा पद्धतीने
धीरज परब, मीरा रोड
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद झाली असली तरी सीरम एलायझा पद्धतीने केलेल्या चाचणी अहवालानुसारच ६१ रुग्णांना त्याची लागण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर, किट चाचणी गृहीत धरली जात नसल्याने तब्बल ११७५ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे मान्य करण्यास प्रशासन तयार नसून केवळ त्यांना केवळ संशयित रुग्ण असे गोंडस नाव दिले जात आहे. यामुळे शहरातील बहुतांशी खाजगी पॅथॉलॉजी लॅब व रुग्णालयांत केल्या जाणाऱ्या महागड्या किट टेस्टबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली. खाजगी दवाखाने व रुग्णालयांत तापाचे रुग्ण सर्रास आढळतात. बहुतांशी रुग्णांना डेंग्यू, सीबीसी, मलेरिया आदी रक्त चाचण्या करण्यास सांगितले जाते. त्यात डेंग्यूच्या किट टेस्टमध्ये तो निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, असा अहवाल येतो. परंतु, पालिकेचा वैद्यकीय विभाग मात्र या किट टेस्टचा अहवाल ग्राह्यच मानत नाही. सीरम एलायझा टेस्टचा अहवाल विस्तृत प्रमाणासह असल्याने तो ग्राह्य मानला जातो. भक्तिवेदान्त, वॉकहार्ट यासारख्या काही निवडक रुग्णालयांत व मॅट्रोपोलीससारख्या लॅबमध्येच ती टेस्ट केली जाते. ती सर्वसामान्यांसाठी बरीच महागडी असते.
जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांत डेंग्यूच्या १२३६ रुग्णांची नोंद पालिका आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयांत झाली आहे.
यात जुलै - १५९; आॅगस्ट - २८५; सप्टेंबर - ४३१ तर आॅक्टोबरमध्ये ३६१ रुग्ण आढळले.
यापैकी सीरम एलायझा चाचणीनुसार ५६ जणांनाच डेंग्यू झाल्याचे पालिकेने मान्य केले. तर, पालिकेने अन्य ११८० रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी अवघे ५५ जणांचे नमुने पाठवले होते. त्यापैकी केवळ ५ जणांनाच तो झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला. तर, ५० जणांना त्याची लागण नसल्याचे अहवालात निष्पन्न झाले. यावरून उर्वरित ११७५ जण डेंग्यूचे संशयित रुग्ण असल्याची नोंद पालिकेने केली. तर, दुधाराजा मरिया (५५), रा. आर.एन.पी. पार्क, भार्इंदर पूर्व याचा ६ आॅक्टोबर रोजी डेंग्यूने नायर रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पालिकेने ६१ रुग्णच डेंग्यूचे तर ११७५ रुग्ण संशयित ठरवले. मग, त्या ११७५ संशयित रुग्णांनी डेंग्यू म्हणून खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाचे काय? की, डेंग्यू म्हणून निर्माण झालेल्या भीतीपोटी रुग्णांचा गैरफायदा घेतला जातोय, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कीट टेस्टमध्ये एनएस १ एन्टीजन पॉझिटिव्ह आला तर डेंग्यू झाल्याचे मानले जाते. परंतु, शासनातील वैद्यकीय अधिकारी मात्र तो पॉझिटिव्ह मानू नये, असे सांगतात. कदाचित, त्यांना डेंग्यूची आकडेवारी नियंत्रणात ठेवायची असेल.
मुळात डेंग्यू हा एक प्रकारचा सेल्फ लिमिटिंग आजार आहे. शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीच्या क्षमतेनुसार तो बरा होतो. केवळ १० टक्के प्रकरणात तो गंभीर बनतो. परंतु, त्याचा बाऊ केवळ बक्कळ नफ्यातला व्यवसाय म्हणून केला जात आहे का, हे पाहावे लागेल.
‘‘सीरम एलायझा पद्धतीची चाचणीच डेंग्यूसाठी ग्राह्य मानली जाते. कीट टेस्ट पद्धतीची चाचणी गृहीत धरली जात नाही. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह जाणवल्यास त्याच्या राहत्या परिसरात सर्वेक्षण व उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगानेच सारासार विचार करून मोजके नमुने जिल्हा रुग्णालयाकडे पाठवले जातात.’’
- डॉ. प्रकाश जाधव
(वैद्यकीय अधिकारी, मीरा-भार्इंदर महापालिका)