मीरा-भार्इंदरमधील महिलांना मिळणार १०० ‘गुलाबी’ ई-रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 06:11 PM2018-02-18T18:11:47+5:302018-02-18T18:11:56+5:30

मीरा-भार्इंदर शहरातील महिलांना चूल आणि मूल पर्यंतच मर्यादित न ठेवता त्यांच्या सक्षमीकरणाकरीता पालिका महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन शहरातील १०० महिलांना ‘गुलाबी’ ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत.

Mira-Bharinder women will get 100 'pink' e-rickshaws | मीरा-भार्इंदरमधील महिलांना मिळणार १०० ‘गुलाबी’ ई-रिक्षा

मीरा-भार्इंदरमधील महिलांना मिळणार १०० ‘गुलाबी’ ई-रिक्षा

Next

 - राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरातील महिलांना चूल आणि मूल पर्यंतच मर्यादित न ठेवता त्यांच्या सक्षमीकरणाकरीता पालिका महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन शहरातील १०० महिलांना ‘गुलाबी’ ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. लाभार्थी महिलांची यादी येत्या ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाला जाहिर केली जाणार आहे. 

यापुर्वी शहरातील सुमारे ३९ गुलाबी रिक्षांना प्रादेशिक परिवहन विभागाने परमिट दिले असले तरी सध्या केवळ दोनच महिला या रिक्षा चालवित आहेत. उर्वरीत रिक्षांचा रंग बदलून त्या पुरुष चालकांकडुन चालविल्या जात आहेत. अशा स्थितीतही पालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने शहरातील महिलांचे सक्षमीकरण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सुरुवातीला १०० महिलांना गुलाबी ई-रिक्षांचे वाटप केले जाणार आहे. या ई-रिक्षांच्या लाभार्थी महिलांची यादी येत्या ८  मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात जाहिर केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत सादर केला जाणार असुन त्यावरील मान्यतेनंतर शहरातील लाभार्थी महिलांची यादी तयार केली जाणार आहे. अर्थात यात राजकीय समर्थकांचीच वर्णी लागणार असल्याचे जगजाहिर असल्याने यातून मुळ लाभार्थी महिला मात्र वंचित राहणार असल्याची चर्चा महिलांमध्येच सुरु झाली आहे. तरी देखील पालिकेने महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन सुरु केलेल्या या स्तुत्य उपक्रमावर शहरातील महिलांकडुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. लाभार्थी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण पालिकेच्या समाजकल्याण विभागाकडुन मोफत दिले जाणार असुन रिक्षा मिळविण्यासाठी मात्र त्यांना २५ टक्के रक्कम स्वत: उभी करावी लागणार आहे. उर्वरीत ७५ टक्के रक्कम समाजकल्याण विभागामार्फत ७ टक्के या माफक व्याजदरावरील कर्जाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या ई-रिक्षा पर्यावरण पुरक असुन त्या ईलेक्ट्रीकवर चालणाऱ्या असल्याने त्यांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या परमिटची आवश्यकता भासणार नसल्याचा दावा प्रशासनाकडुन करण्यात आला आहे. या रिक्षा राज्य सरकारच्या 

निर्देशानुसार इंडो-इस्त्रायल चेंबरद्वारे खरेदी करण्यात येणार असुन त्याची किंमत १ लाख ६५ हजार इतकी गृहित धरण्यात आली आहे. रिक्षासाठी लाभार्थी महिला १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तसेच त्या शहरातील रहिवाशी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी रहिवासाचा दाखला सादर करावा लागणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला मागास तसेच अल्पसंख्याक प्रवर्गातील असाव्यात व त्यांच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक ठरणार आहे. याखेरीज त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे.
महिलांच्या स्वयंरोजगारासाठी पालिकेकडुन सुरु करण्यात येणारा हा स्तुत्य उपक्रम सत्कारणी लागावा, यासाठी लाभीर्थी महिलांना प्राप्त होणाऱ्या रिक्षा त्यांनी नियमितपणे चालवाव्यात, त्यांचे रंग बदलून त्या पुरुष चालकांना भाडेतत्वावर चालविण्यास देऊ नयेत, अशी अपेक्षा प्रशासनाकडुन बाळगण्यात आली आहे. मात्र यासाठी पालिकेकडुन अद्याप कोणतेही धोरण निश्चित करण्यात आले नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या त्या रिक्षांप्रमाणेच या ई-रिक्षांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Mira-Bharinder women will get 100 'pink' e-rickshaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.