मीरा-भाईंदरमध्ये वारा-पावसाने 40 झाडांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 04:50 PM2020-08-04T16:50:37+5:302020-08-04T16:50:44+5:30
सोमवारी रात्री पासून वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस आज मंगळवारी कायम होता.
मीरा रोड - सोमवारी रात्रीपासून वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत मीरा भाईंदरमध्ये तब्बल 40 झाडांची पडझड झाली आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. मीरारोडच्या आरएनए कोर्टयार्डमधील एक झाड पडून 3 मोटारींचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री पासून वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस आज मंगळवारी कायम होता.
वाऱ्यामुळे मीरारोड भागात 13, भाईंदर पूर्व भागात 10 , भाईंदर पश्चिम भागात 5 तर उत्तन भागात १२ झाडं पडली आहेत . या एकूण 40 झाडांच्या पडझडीत जीवित हानी झालेली नसून नुकसान देखील एक - दोन ठिकाणी झालेले आहे. रस्त्यावरची झाडे पडल्याने काही काळ वाहतूक मात्र बंद करावी लागली होती. मीरारोडच्या आरएनए कोर्टयार्ड वसाहतीच्या आवारातील झाड पडून खाली उभ्या असलेल्या 3 मोटारींचे नुकसान झाले आहे. तर पाली भागात सूर्य निकेतन रुग्णालय जवळ पडलेल्या झाडाने एका घराचा पत्रा तुटला. गोराई मार्गावरील न्यायायिक अकादमी जवळ चार झाडे तर याच मार्गावर असलेल्या पोलीस ठाण्याजवळ दोन झाडे पडली. याशिवाय शहरात न्यू गोल्डन नेस्ट, शांती नगर, इंदिरा कोठार, सृष्टी आदी विविध ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पालिकेच्या उद्यान विभागातील मजुरांनी तर अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम केले.
शहरात होणाऱ्या या झाडांच्या पडझडी मागे झाडांच्या सभोवताली केले जाणारे काँक्रिटीकरण व डांबरीकरण कारणीभूत आहे. झाडांच्या मुळांना खोल जमिनीत पसरण्यास माती मिळत नसल्याने ती कमकुवत होऊन उन्मळून पडत असल्याची चिंता पर्यावरणासाठी कार्यरत कार्यकर्त्या रुपाली श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. हरित लवाद आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे देखील पालिका पालन करत नसल्याने झाडे उन्मळून पाडण्याचे प्रकार जास्त असल्याचे त्या म्हणाल्या.