भाईंदरमध्ये रंगणार स्वर - संगीताची मैफल; १ ते ४ फेब्रुवारी आर्ट फेस्टिव्हल
By धीरज परब | Published: January 29, 2024 07:30 PM2024-01-29T19:30:44+5:302024-01-29T19:31:06+5:30
प्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह दिग्गज कलाकारांची उपस्थिती
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील कला रसिक नागरिकांना प्रतीक्षा असलेला संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल यंदा १ ते ४ फ़ेब्रुवारी दरम्यान अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या कलाविष्काराने रंगणार आहे . प्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह दिग्गज कलाकारांच्या कलेचा आस्वाद तसेच वॅक्स म्युझियम , चित्रकला प्रदर्शन नागरिकांना भाईंदरच्या इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात पाहता येईल .
मीरा भाईंदर शहरातील नागरिकांची कला व सांस्कृतिक गरज पूर्ण करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ वर्षांपूर्वी 'संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'ला सुरुवात केली. प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्याकडून या आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. यंदा प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे 'संस्कृती मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल' होत आहे .
१ फ़ेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर यांचा गाण्याचा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ६. ३० वाजता प्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह होणार आहे. जग प्रसिद्ध असलेले पंडीत चौरसिया पहिल्यांदा मीरा भाईंदर शहरात येत असल्याने मोठ्या संख्येने कलाप्रेमींची उपस्थिती होण्याची शक्यता आहे . सायंकाळी ७ वाजता गायिका गीता रबरी यांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.
३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६. ३० वाजता ४ दिग्ग्ज कलाकारांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन , उस्ताद रफिक खान यांचे सितार वादन , पंडित मुकुंदराज देव यांचे तबला वादन , पंडित शैलेश भागवत यांचे शेहनाई वादन होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता 'गीत रामायण' हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. रविवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६. ३० वाजता भाग्यश्री व धनश्री या बहिणींचा प्रसिद्ध असलेला गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे . भाव गीते आणि राम भक्तीची गीते गाण्यासाठी त्या प्रसिद्ध असून नुकतेच २२ जानेवारी रोजी भक्ती गीते गाण्यासाठी त्यांना अयोध्या येथेही बोलावण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता 'जय श्री राम - रामायण ' हे महानाट्य सादर होणार आहे . दिग्गज कलाकारांसह एकूण १५० कलाकारांचा या महा नाट्य मध्ये सहभाग असणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे चित्र प्रदर्शन या फेस्टिव्हल मध्ये असणार आहे . 'वॅक्स म्युझियम' म्हणजेच मेणाचे पुतळे पाहण्यासाठी लोकांना दूर दूर जावे लागते. मीरा भाईंदर आर्ट फेस्टिव्हल मध्ये 'वॅक्स म्युझियम ' चे दालन असणार असून त्यात २५ प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे लोकांना पाहता येणार आहेत. रांगोळी प्रदर्शन , लहान मुलांना खेळण्यासाठी जागा , किड्स ऍडव्हेंचर गेम्स , फूड कोर्ट येथे असतील. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम करण्यासाठी वेगळे व्यासपीठ ठेवण्यात आले आहे .
फेस्टिव्हलचे उदघाटन दिवशी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मीरा भाईंदर शहरातील सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारी परेड होईल. त्यात शहरातील सर्व जाती - धर्माचे लोक आपल्या पारंपरिक पोशाखात आपल्या संस्कृती परंपरेचे दर्शन घडवतील. एनसीसीचे विद्यार्थी परेड मध्ये सहभागी होतील. परेड पासून फेस्टिवल ला सुरुवात होणार आहे.
फेस्टिव्हलचे आकर्षक प्रवेश द्वार , चित्र प्रदर्शन , विविध कला प्रदर्शन दालने असणार आहेत. तसेच लहान मुलासाठी 'गेम झोन' , खाद्यप्रेमींसाठी फूड स्टोल असणार आहेत. कल्चरल ऍक्टिव्हिटी , फन फेयर , सेल्फी पॉईंटसह अनेक आकर्षक कला-संस्कृतीशी निगडित गोष्टी पाहायला मिळतील. मीरा भाईंदर शहरात प्राणी प्रेमी खूप आहेत. अनेकांच्या घरात पाळीव कुत्रे , मांजरी आहेत. त्यामुळे या फेस्टिव्हल मध्ये रविवारी सकाळी 'पेट शो'चे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसात किमान २ लाख लोक या महोत्सवाला भेट देणार असून या फेस्टिव्हलमध्ये प्रवेश मोफत मिळणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले .