मीरा-भाईंदरचे नगरसेवक देणार पूरग्रस्तांसाठी एका महिन्याचे मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:31 PM2019-08-14T22:31:52+5:302019-08-14T22:32:58+5:30
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत.
मीरा रोड - पश्चिम महाराष्ट्र, कोकण आदी राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मीरा-भाईंदर महापालिकेचे सर्व नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन देणार आहेत. महापालिका आयुक्त देखील महिन्याचे वेतन देणार असून, वर्ग १ व २ चे अधिकारी १५ दिवसांचे तर वर्ग ३ - ४ चे कर्मचारी ५ दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देतील. या शिवाय महापालिका १ कोटी रुपये देणार आहे.
आज बुधवारी झालेल्या महासभेत पूरग्रस्तांसाठी शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी सेनेचे सर्व २२ नगरसेवक महिन्याभराचे मानधन देणार असल्याचे सांगीतले. तसे लेखीपत्र महापालिकेस सेनेने दिले आहे. उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी देखील भाजपाचे सर्व ६१ नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने आधीच त्यांचे नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार असल्याचे म्हटले होते.
उपमहापौर वैती यांनी या वेळी महापालिकेने देखील पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी सूचना आयुक्तांना केली. त्यावर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी महासभेने तसा ठराव करावा व तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवेन असे सांगितले. यावेळी आयुक्तांनी आपण आपला महिन्याभराचा पगार पूरग्रस्तांसाठी देत असल्याचे सांगत महापालिकेतील वर्ग १ व २ चे अधिकारी आपले १५ दिवसांचे वेतन देणार आहेत, तर वर्ग ३ व ४ चे कर्मचारी आपले ५ दिवसांचे वेतन देणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महासभेने एक सर्वपक्षीय समिती तयार करून शहरातील उद्योजक, दानशूर आदींना आवाहन करून निधी गोळा करावा आणि तो पूरग्रस्तांसाठी द्यावा, अशी सूचना देखील आयुक्तांनी केली.
भाजपाच्या नगरसेविका दीपाली मोकाशी यांनी मात्र मदतीचे मार्केटिंग करू नका, असे सुनावत तेथे प्रत्यक्ष तिकडची परिस्थिती पहा म्हणजे तुम्हाला कळेल. डॉक्टरांचे पथक पाठवा. पूरग्रस्तांना माणुसकी म्हणुन मदत करा , कीती केली ती दाखवायची गरज नाही. मदतीचा केवळ ड्रामा चालला आहे, असा संताप व्यक्त केला.