मीरा-भाईंदर मेट्रोचा अखेर श्रीगणेशा; ठाणे, मुंबईला जोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:33 AM2019-09-10T00:33:07+5:302019-09-10T00:33:38+5:30
मेट्रोच्या कंत्राटदाराकडून भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरांतील नागरिकांच्या बहुप्रतीक्षित अशा मेट्रोच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ऐन गणेशोत्सव काळात मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. रस्त्यावर बॅरिगेट्स लावून खोदकामाला सुरुवात झाल्याने येणारी विधानसभा निवडणूक पावली की गणपती बाप्पा पावला, अशी खुमासदार चर्चाही नागरिकांमध्ये रंगली आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीवेळी मीरा-भार्इंदरला मेट्रो मंजूर केल्याची घोषणा झाली. निवडणुकीत भाजप-शिवसेनेने त्याच्या श्रेयाचा प्रचारही केला. पण, ‘लोकमत’ने मात्र मेट्रोसाठी एमएमआरडीएने अंदाजपत्रकात तरतूदच केली नसल्याचे तसेच त्यांच्या संकेतस्थळावरही मेट्रोचा लवलेश नसल्याचे उघड केल्यानंतर श्रेय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपची चांगली गोची झाली. सामाजिक संघटनांसह अन्य राजकीय पक्षांनीही महासभेत तसेच बाहेरही जाब विचारत आंदोलने केली. शिवसेनेने तर दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री अशा सणांना मेट्रोसाठी आंदोलने केली.
काही महिन्यांनी दहिसर पूर्वेतून भाईंदर अशा मेट्रोमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर आर्थिक तरतूद तसेच निविदा प्रक्रिया सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले गेले, पण काम मात्र काहीच सुरू होत नव्हते. आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन १५ आॅगस्टपर्यंत कामास सुरुवात करा, अशी मागणी केली होती. पण, आॅगस्टअखेरीस काम सुरू करण्याचे आदेश त्यांना दिले होते.
मीरा-भाईंदर मेट्रोच्या मार्गावर सोमवारी कामाला सुरु वात झाली आहे. काशिमीरानाका, झंकार कंपनी, साईबाबानगर, दीपक रुग्णालय येथे कामाला सुरु वात झाली आहे. या कामासाठी बॅरिगेट्स लावले आहेत. तीन ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, असे सांगत खºया अर्थाने मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
मीरा-भाईंदरला मेट्रोने जोडावे, अशी मागणी आ. सरनाईक यांनी २००९ पासून शासनाकडे सातत्याने केली असून तत्कालीन आमदार मुझफ्फर हुसेन, तत्कालीन खासदार संजीव नाईक, खासदार राजन विचारे, तत्कालीन महापौर गीता जैन यांच्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनीही मेट्रोची मागणी केली होती. मेट्रोसाठी शहरात विविध संघटनांनी मिळून आंदोलन उभारले होते. काँग्रेसने सह्यांची मोहीमही राबवली होती. ठाण्याची मेट्रो काशिमीराच्या शिवाजी महाराज चौकात दहिसर-मीरा-भार्इंदर मेट्रोला मिळणार आहे. त्यामुळे आता थेट ठाणे व मुंबईला मेट्रोने जोडले गेल्याने रेल्वे तसेच रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
भाईंदरपाडा, दहिसर येथे कारशेड
जे. कुमार कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून मीरा-भार्इंदर मेट्रोसाठी सहा हजार ६०७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे ११ किमीचा मार्ग असणार आहे. त्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशिगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग उद्यान, सुभाषचंद्र बोस मैदान अशी एकूण आठ स्थानके असणार आहेत. या मेट्रोमार्गासाठी भार्इंदरपाडा व दहिसर येथे कारशेड डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे.