सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: June 13, 2024 07:11 PM2024-06-13T19:11:55+5:302024-06-13T19:14:56+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून कांदळवन क्षेत्रात बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका गुन्ह्यात ठेवला आहे .
मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या मुर्धाखाडी येथील सरकारी जागेत कांदळवन क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणार भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या मुलासह अन्य एका वर भाईंदर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दखल करण्यात आला आहे .
भाईंदर पश्चिमेस मुर्धा खाडी मधून बेकायदेशीर कच्चा पूल तयार करून त्यावरून कांदळवन क्षेत्रातील सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम केले जात होते . सदर बेकायदा बांधकाम कांदळवन क्षेत्रात ५० मिटर बफर झोन मध्ये केले गेले . खाडीत पूल बांधण्यासाठी कांदळवन तोडले गेले . ह्या बाबत फोट फ्युचर इंडिया चे हर्षद ढगे यांनी तक्रार केली होती .
या प्रकरणी कांदळवन समितीची स्थळ पाहणी झाल्या नंतर अहवाला नुसार अपर तहसीलदार निलेश गौंड यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते . तलाठी अनिता पाडवी यांच्या फिर्यादी नुसार १० जून रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात भुपेन गजानन म्हात्रे व हार्दिक धीरज माछी दोन्ही रा. मुर्धा खाडी यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून कांदळवन क्षेत्रात बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका गुन्ह्यात ठेवला आहे . परंतु सरकारी जागा बळकवून बांधकाम केल्याचे कलम लावण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे .
आरोपी भूपेन म्हात्रे हा स्थानिक भाजपाच्या माजी नगरसेविका नयना म्हात्रे यांचा मुलगा आहे . मुर्धा , राई , मोरवा भागात सर्रास सरकारी जागा आणि कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम करण्यात , सदर बेकायदा बांधकामांना कर आकारणी , नळ जोडणी मिळवून देणे , वीज पुरवठा मिळवून देणे आदी कामात माजी नगरसेवकांची मुलं तसेच नातलग हे दलालांच्या भूमिकेत सक्रिय असल्याचे आरोप केले जात आहेत. महापालिका अधिकारी देखील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत आले आहेत . भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.