मीरा-भाईंदरमध्ये कुठे निर्बंधांचे पालन, तर कुठे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:01+5:302021-04-16T04:41:01+5:30
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे मीरा-भाईंदरमध्ये बहुतांश ठिकाणी पालन केले गेले़, तर अनेक ठिकाणी ...
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे मीरा-भाईंदरमध्ये बहुतांश ठिकाणी पालन केले गेले़, तर अनेक ठिकाणी उघडपणे उल्लंघन सुरू हाेते़. मात्र त्याकडे पालिका, पोलीस व नगरसेवक-राजकारणी यांनी कानाडोळा केला. जेणेकरून भाजीपाला व अन्य वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांसह रस्ते-दुकानातून खाद्य-पेयपदार्थ विकणाऱ्यांकडे गर्दी झाली. मास्क घालणे व नियमांचे पालन तर सर्रास धाब्यावर बसवल्याचे ठिकठिकाणी दिसत होते.
मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली़. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती़ महापालिकेने भाजीपाला-फळे यासाठी मैदानात सकाळची ७ ते ११ वेळ जाहीर केली असताना, त्याला न जुमानता शहरातील मुख्य रस्ते, पदपथ आणि गल्ल्यांमध्ये त्यांची विक्री सुरू हाेती.
बहुतांश फेरीवाल्यांनी मास्क हे नाका-तोंडाच्या खाली घातले होते; तर काहींनी घातले नव्हते. त्याठिकाणी लोकांचीही खरेदीसाठी गर्दी उसळली होती. गर्दीतील अनेक बेजबाबदार नागरिकांनीही मास्क नाका-तोंडाच्या खाली घातले होते़. रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेल, दुकानांतही नागरिकांनी गर्दी केली हाेती़; मात्र बहुतांश दुकाने बंद हाेती़. गल्ली-बाेळातील काही दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून सुरू हाेती. रिक्षांचे प्रमाण जास्त नसले, तरी वाहनांची वर्दळ फारशी कमी झालेली नव्हती.