मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे आणखी १२ परिसर बाधित घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:07 PM2020-04-24T14:07:57+5:302020-04-24T14:08:11+5:30
शहरातील एकुण बाधित क्षेत्रांची संख्या ४५
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे शुक्रवार सकाळच्या पालिका अहवाला पर्यंत ११७ रुग्ण झाले असुन महापालिकेने शहरातील आणखी १२ परिसर हे कोरोना बाधित क्षेत्र म्हणुन जाहिर केले आहे. प्रशासनाच्या आदेशातील आकडेवारी नुसार शहरातील एकुण बाधित क्षेत्रांची संख्या ४५ पर्यंत पोहचली आहे.
आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी २३ एप्रिल रोजी आदेश काढुन भार्इंदरच्या शिर्डि नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर गल्ली ५, इंदिरा कॉम्पलॅक्स, न्यु गोल्डन नेस्ट, इंद्रलोक फेज ६, खारीगाव मधील परिसर हे कोरोना बाधित क्षेत्र जाहिर केले आहेत. शिवाय काशिमीराचे राज इस्टेट समोर तर मीरारोडचे प्लेझेंट पार्क, आबिद पटेल शाळे जवळ, नया नगर, साई कॉम्पलॅक्स, शांती नगर सेक्टर - १० बाधित क्षेत्र जाहिर केली आहेत.
या आधी देखील कोरोना रुग्ण आढळलेले परिसर बाधित क्षेत्र म्हणुन प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. आता पर्यंत कोरोना बाधित क्षेत्रांची संख्या ४५ झालेली आहे. या बाधित क्षेत्रां साठी पालिकेचे वैद्यकिय अधिकारी, पोलीस अधिकारी - कर्मचारी व पालिका कर्मचारी यांच्या पथकांची नियुक्ती सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत करण्यात आली आहे.
या बाधित क्षेत्रातील नागरिकांना भाजीपाला, दुध, अन्नधान्य, औषधे मिळण्यासाठी सहकार्य करावे. नागरिकांना घरा बाहेर पडु न देणे, रस्त्यावर अनावश्यक फिरु न देणे, गर्दी टाळणे, इमारतीच्या पदाधिकारायांशी समन्वय ठेवणे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना कळवणे आदी जबाबदाराया आयुक्तांनी या पथकांना नेमुन दिल्या आहेत. कोरोनाचा घट्ट होत चाललेला विळखा सोडवण्यासाठी बाधित क्षेत्रांसह शहरातील अन्यभागातील नागरिकांनी देखील शासन - पालिका निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.