मीरा भाईंदर भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यालयास मेहतांच्या नेतृत्वाखाली विरोध, पक्षातील मतभेद तीव्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 02:36 PM2021-02-04T14:36:08+5:302021-02-04T14:40:11+5:30

Mira Bhayander BJP News : २०१४ सालच्या नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे नरेंद्र मेहता हे आमदार म्हणून विजयी झाले.

Mira Bhayander BJP's new district office | मीरा भाईंदर भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यालयास मेहतांच्या नेतृत्वाखाली विरोध, पक्षातील मतभेद तीव्र  

मीरा भाईंदर भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यालयास मेहतांच्या नेतृत्वाखाली विरोध, पक्षातील मतभेद तीव्र  

Next

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे जिल्हा कार्यालय हे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या गाळ्यांमधून काढून भाईंदर पश्चिमेला पक्षाचे नवीन जिल्हा कार्यालय असून त्याचे उदघाटन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी करणार आहेत. परंतु नवीन कार्यालयास विरोध आणि जिल्हाध्यक्ष हटावची आग्रही भूमिका मेहतांसह त्यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्याकडे मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१४ सालच्या नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे नरेंद्र मेहता हे आमदार म्हणून विजयी झाले. २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. परंतु मनमानी कारभार, दाखल विविध गुन्हे, सतत होणारे गंभीर आरोप व तक्रारी आदींमुळे वादग्रस्त ठरलेल्या मेहतांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील नागरीकांनी पराभवाची धूळ चारली. त्यांची अर्धनग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली शिवाय त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांची प्रतिमा डागाळली.

मेहतांनी राजकारण सोडले असे स्वतःच जाहीर केले असले तरी आजही महापालिका व भाजपात ते सक्रिय आहेत. तर दुसरीकडे आमदार गीता जैन भाजपा सोडून शिवसेनेत गेल्या आहेत. त्यामुळे भाजपातीलच काही नगरसेवक, पदाधिकारी आदींनी मेहता हटवा व भाजपा आणि शहर वाचवा अशी मोहीमच छेडली आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठीना तक्रारी केल्या आहेत. भाजपातील मेहता गट व विरोधक असे चित्र असून आपसात गदारोळ, वाद चव्हाट्यावर येत आहेत.

त्यातच सेव्हन स्क्वेअर शाळेच्या बाहेर मेहतांच्या ७११ कंपनी कार्यालयाच्या इमारतीतील भाजपाचे जिल्हा कार्यालय बंद करून भाईंदर पश्चिम येथे नवीन जिल्हा कार्यालय सुरु करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी घेतला आहे. नवीन कार्यालयाचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी केले जाणार आहे. त्यामुळे मेहता समर्थकां मध्ये खळबळ उडाली आहे.

मेहता समर्थकांनी थेट जिल्हाध्यक्ष म्हात्रे हटाव अशी मागणी चालवली आहे. बुधवारी रात्री उशिरा मेहतांसह त्यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी आदींनी थेट आमदार व भाजपा सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. नवीन कार्यालयास विरोध करत म्हात्रेंच्या बद्दलच्या तक्रारी सांगत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. नवीन कार्यालयाच्या उदघाटनास जाणार नाही असे सांगण्यात आले. त्यावर चव्हाण यांनी पक्षाचे कार्यालयचे उदघाटन आपले नेते फडणवीस करणार असून पक्ष महत्वाचा आहे असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. चव्हाण यांच्या भेटी  नंतर पहाटेच्या सुमारास सर्वजण शहरात परतले. आमदार चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

वास्तविक हेमंत म्हात्रे व त्यांचे कुटुंबीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ व नंतरच्या भाजपात सक्रिय आहेत. शहरात जेव्हा भाजपा - संघ नाममात्र होती तेव्हा पासून ते निष्ठेने सोबत आहेत. त्यांचे काका उमेश हे सुद्धा खूप वर्षा पूर्वी जिल्ह्याचे प्रमुख होते. हेमंत देखील ठाणे जिल्ह्याचे संघटन मंत्री पदी होते. त्यामुळे संघ - भाजपशी एकनिष्ठ असलेल्या हेमंत म्हात्रें विरोधात मेहता समर्थकांनी उघडलेली आघाडी कितपत यशस्वी होईल याची देखील चर्चा भाजपात आहे.

रात्री आम्ही आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. परंतु हा सर्व संघटनचा विषय असल्याने मी त्या बद्दल काही बोलणार नाही. 
- हसमुख गेहलोत ( गटनेते व उपमहापौर ) 

२००९ साली मेहतांना विधानसभेची भाजपाची उमेदवारी मिळाली त्यावेळी ७११ कंपनीच्या इमारतीत भाजपाचे जिल्हा कार्यालय सुरु केले होते. मेहतांनी भाजपाच्या बळावर आमदार पासून अनेक पदे मिळवली, पालिकेत भाजपाची सत्ता स्वतःकडे ठेवली तसेच त्यांची कंपनी व संपत्तीची प्रचंड भरभराट झाली. परंतु पक्षाचे कार्यालय मात्र मेहतांनी पक्षाच्या मालकीचे करून दिले नाही. एका व्यक्तीच्या जोखडातून उशिराने का होईना भाजपाचे स्वतंत्र कार्यालय जिल्हाध्यक्ष सुरु करत आहेत त्याचा आनंद आहे.
- डॉ . सुरेश येवले ( ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते ) 


 

Web Title: Mira Bhayander BJP's new district office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.