Mira Bhayander : नागरिकांना वेठीस धरणाऱ्या परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा ठेका अखेर आयुक्तांनी केला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 09:52 PM2020-10-06T21:52:09+5:302020-10-06T21:55:19+5:30
दोन्ही आमदारांनी केली होती मुख्यमंत्र्याना तक्रार, तर गीता जैन ह्यांनी दिला होता उपोषणाचा इशारा
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद ठेऊन शहरातील नागरिकांना सातत्याने वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा ठेका अखेर आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांनी रद्द केला आहे . सदर ठेकेदाराचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाशी संगनमत असल्याचा आरोप करत आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन ह्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार केली होती . आ. गीता ह्यांनी तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता . तर बससेवा सुरु करणे तातडीची गरज असल्याने पालिकेने स्वतः चालवली आहे .
मीरा भाईंदर महापालिकेने बससेवा चालवण्यासाठी गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी करारनामा करून मनोहर सकपाळ ह्यांच्या मे . भागीरथी एमबीएमटी ह्या ठेकेदाराला ठेका दिला . कोरोना संसर्गा मुळे बससेवा केवळ परराज्यातील नागरिकाना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी तसेच पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करण्यासाठी चालवली गेली . तद नंतर ३१ मे पासून पालिकेने ठेकेदारास बस सेवा सुरु करण्यास सांगून देखील ठेकेदाराने बस चालवल्या नाहीत . ठेकेदाराने १४ ऑगस्ट पासून केवळ उत्तन मार्गावर ५ बस सुरु केल्या त्या देखील ८ सप्टेंबर पासून बंद पडल्या.
ठेकेदाराने जास्तीचे पैसे मागितले . तसेच पुरवणी करार करण्याची मागणी केली . सत्ताधारी भाजपाने देखील घेतल्याने त्यांचे ह्यात हितसंबंध असल्याचे आरोप झाले . २१ सप्टेंबर रोजी आयुक्तांनी ठेका रद्द करण्या बाबत नोटीस बजावली असता २३ रोजी बैठक होऊन ठेकेदाराने बस सेवा सुरु करतो असे मान्य केले . पालिकेने देखील ठेकेदाराला पुरवणी करार करून ज्यादा पैसे देण्याची तयारी केली .
ठेकेदाराने २५ सप्टेंबर पासून १० बस तर २८ सप्टेंबर पासून २१ बस चालवण्याचे सांगून देखील त्याने बस सुरूच केल्या नाहीत . पालिकेची बससेवा नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होऊन नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करत अन्य मार्गाने प्रवास करावा लागत आहे .
पालिका आणि सत्ताधारी भाजपाने शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्या ऐवजी ठेकेदाराचा आर्थिक फायदा करून दिल्याने ह्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आ. सरनाईक ह्यांनी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली .
ठेकेदारास मोफत बस दिल्या , अत्याधुनिक डेपो - साहित्य दिले, तिकीट व जाहिरातीचे उत्पन्न ठेकेदारास दिले . वर आणखी प्रति किमी २६ रुपये आणि अतिरिक्त पैसे देऊन त्याला प्रचंड आर्थिक फायदा करून सुद्धा तो बस चालवत नसल्याने आमदार गीता जैन ह्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना तक्रार करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला . दोन्ही आमदारांनी ठेका रद्द करून बस सेवा नागरिकांसाठी सुरु करण्याची मागणी चालवली होती .
अखेर आयुक्तांनी सोमवारी मे . भागीरथी एमबीएमटीचा ठेका रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत . ठेकेदारास वारंवार सांगून आणि बाजू मांडण्याची संधी देऊन देखील त्याने बससेवा सुरु न केल्याने मूळ करारनाम्यासह पुरवणी करारनामा देखील रद्द करण्यात आला आहे .