मीरा-भाईंदर उपमहापौरांनी गणपती नाचवला; माघी गणेश जयंती उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:43 AM2019-02-13T11:43:32+5:302019-02-13T11:45:11+5:30
या गणेशाचे विसर्जन दुसऱ्या दिवशी केले जात असले तरी काही ठिकाणी त्याचे विसर्जन श्रद्धेप्रमाणे केले जाते.
भाईंदर - नुकत्याच झालेल्या माघी गणेश जयंतीला मीरा-भाईंदर शहरात प्रामुख्याने आगरी कोळी समाजातील बहुतांशी कुटुंब गणपतीची प्रतिष्ठापना करतात. त्यापैकी उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या घोडबंदर येथील घरी देखील दरवर्षी गणपतीचे आगमन होत असते. या गणेशोत्सवात या कुटुंबांमध्ये उल्हासाचे वातावरण असते. त्यामुळे अनंत चतुर्थीप्रमाणे माघी गणेशोत्सवाचे वातावरण यावेळी ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिष्ठापित केलेल्या गणेश मूर्त्यांमुळे दिसून आले.
या गणेशाचे विसर्जन दुसऱ्या दिवशी केले जात असले तरी काही ठिकाणी त्याचे विसर्जन श्रद्धेप्रमाणे केले जाते. असाच विसर्जनाचा सोहळा उपमहापौरांच्या घरातील गणेश विसर्जनावेळी रंगला होता. विसर्जनाला बॅन्ड पथकाने सूर लावताच उपमहापौरांनी गणपती डोक्यावर घेऊन त्याला नाचवायला सुरुवात केली. ही त्यांच्या कुटुंबातील परंपरा मानली जात असल्याने खुद्द उपमहापौरांनी ठेका धरल्याने त्यांच्या भोवती भाविकांची गर्दी जमली होती. विसर्जनासाठी नटलेल्या सुवासिनींनी त्यांच्यावर गुलाल, फूलांची उधळण करुन त्यांच्या नृत्याला दाद दिली. यावेळी उपमहापौरांनी ही तर आमच्या कुटुंबातील प्रथाच असल्याचे सांगितले.