मीरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षांना मानत नाही; मेहता समर्थक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:53 PM2021-02-10T23:53:33+5:302021-02-10T23:53:53+5:30
मेहतांच्या कंपनीच्या गाळ्यातील कार्यालय हे जिल्हा कार्यालय म्हणून सुरूच राहील आणि म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानतच नाही, अशी भूमिका मेहता समर्थकांनी घेतली आहे.
मीरा राेड : राजकारण सोडल्याचे सांगणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपवर वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या भाजपच्या नव्या जिल्हा कार्यालयाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. मेहतांच्या कंपनीच्या गाळ्यातील कार्यालय हे जिल्हा कार्यालय म्हणून सुरूच राहील आणि म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानतच नाही, अशी भूमिका मेहता समर्थकांनी घेतली आहे.
मेहतांनी रविवारी रात्री एका सभागृहात समर्थकांची सभाही घेतली. पालिका व पक्षात मेहता सक्रिय असून, त्यांच्या हस्तक्षेपाविरोधात भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मेहता हटाव, शहर-भाजप बचाव, अशी भूमिका घेतली आहे. त्याविराेधात मेहता व त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच भाजपचे सेव्हन स्क्वेअर शाळेबाहेरील मेहतांच्या ७११ कंपनीच्या गाळ्यात असलेले भाजप जिल्हा कार्यालयाऐवजी स्वतंत्र वेगळे जिल्हा कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी घेतल्याने मेहता व समर्थकांत खळबळ उडाली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन होऊ नये, तसेच जिल्हाध्यक्ष हटावसाठी मेहता यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी मध्यरात्री आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली हाेती. मात्र, भाईंदर पश्चिम येथील या नव्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे मेहता समर्थकांना नाइलाजाने हजर राहावे लागले हाेते. दरम्यान, रविवारी मेहता यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांची बैठक झाली. बैठकीत मेहतांच्या कंपनीच्या मालकी जागेतील कार्यालय हे भाजपचे जिल्हा कार्यालय राहील. नवघर भाजप मंडळ अध्यक्ष मधुसूदन पुरोहित म्हणाले की, मेहता यांच्या उपस्थितीत बैठक झाली; पण ती पक्ष संघटनेबाबत होती. याव्यतिरिक्त मी काही बोलणार नाही.
क्लिपमुळे खळबळ
मेहता समर्थक यशवंत ऊर्फ अण्णा आशीनकर यांची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्षांसोबतच्या संभाषणाच्या त्या क्लिपमध्ये आम्ही हेमंत म्हात्रेंना जिल्हाध्यक्ष मानत नाही, असे सांगतानाच आशीनकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचे नाव ठेवू? की नको ठेवू? असे म्हटले आहे. भाजपमध्ये दोन गट झाले असून, रविवारी झालेल्या बैठकीला २००-२२५ जण उपस्थित हाेते, असे आशीनकर यांनी म्हटले आहे.