मीरा भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:12 PM2018-03-27T19:12:24+5:302018-03-27T19:13:12+5:30
मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
मीरारोड - मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मीरा भाईंदर का उपाशी’, मीरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे पोस्टर झळकावून आंदोलन केले. एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रो साठी तरतूदच केली नसल्याचे वृत्त लोकमतने दिले होते .
आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात, एमएमआरडीए च्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख व त्यासाठी तरतूद करण्यात आली नाही असे दिसुन आले . या मुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मीरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या ७ ते ८ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षण हि पूर्ण झाले होते.
परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या ६ महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे आश्वासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.
या सर्व प्रकारामुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून लोक मेट्रोची उत्साहाने वाट पाहत असल्याने अधिवेशनाच्या याच आठवड्यात मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाबाबत घोषणा करून आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना एमएमआरडीए ला द्याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे केली आहे. तसेच या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून मीरा भाईंदर मेट्रो कधी सुरु होणार अशी विचारणा केली.