मीरा भाईंदरमध्ये आयुक्त रस्त्यावर उतरले; खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती
By धीरज परब | Published: September 21, 2022 11:43 AM2022-09-21T11:43:38+5:302022-09-21T11:44:13+5:30
हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या असं आयुक्तांनी म्हटलं.
मीरारोड - मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांप्रकरणी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांना जातीने लक्ष देऊन योग्य पद्धतीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने शहरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहतुकीची कोंडी, अपघात आणि शारीरिक जाच नागरिकांना सहन करावे लागत आहेत. मध्यंतरी भरलेले खड्डे पुन्हा पडले असून त्यात टाकलेली खडी - रेती रस्त्यावर पसरली आहे.
आयुक्त दिलीप ढोले यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेणारी बैठक घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यात शहर अभियंता दिपक खांबित सह उप अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता आदी बैठकीला हजर होते. पुन्हा जोरात पडणाऱ्या पावसामुळे शहरात खड्डे परिस्थिती निर्माण झाल्याचे आयुक्त यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, उड्डाण पूल ते ते सुभाषचंद्र बोस मैदान, ठाकूर मॉल ते वेस्टर्न हॉटेल, हटकेश चौक ते सगणाई माता मंदिर ह्या मुख्यत्वे मार्गावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या. खड्डे बुझविताना डांबराची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची ठेवण्या सह अभियंत्याने उभे राहून कामाची पाहणी करण्याचे व तशी छायाचित्रे वरिष्ठांना सादर करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे .
आयुक्तांनी वेस्टर्न हॉटेल, हटकेश चौक ते सगणाई माता मंदिर आदी भागातील खड्डे आणि खड्डे बुजवण्याची कामांची पाहणी केली. खड्डे हे कोल्ड मिक्स व जेट पॅचर मशिन वापरुन बुजविणे, रस्त्यावरील दगड, माती हटवुन रस्ते वाहतुकीस सुस्थितीत ठेवणे, रस्त्यावर साचणारे पाणी जाण्यासाठी उपाययोजना करणे जेणेकरुन डांबरावर पाणी साचुन खड्डे पडणार नाहीत आदी सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारास केल्या .