मीरा भाईंदर महापालिकेने नैसर्गिक खाड्यांना ठरवले नाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:02 AM2020-12-01T11:02:04+5:302020-12-01T11:02:15+5:30
Mira Bhayander Municipal Corporation : भाईंदर पश्चिमेच्या क्रांतीनगर ते बजरंग नगर आणि ओंसई कॉम्प्लेक्स ते जयअंबे नगर व वसई खाडी पर्यंत देखील दोन पक्के काँक्रीट नाले बांधण्याचा पालिकेने प्रस्ताव दिला आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने नैसर्गिक खाडयांना आणि खाडी पात्र परिसरास चक्क नाले ठरवून काँक्रीटचे पक्के नाले बांधकाम करण्यासाठी एमसीझेडएमए कडे मंजुऱ्या मिळवण्याचा घाट घातला आहे . तर एमसीझेडएमए आणि कांदळवन सेलने देखील खाड्याना नाले ठरवत अटीशर्तींवर प्राथमिक परवानग्या दिल्या आहेत . त्यामुळे पर्यावरणाचे रक्षणकर्तेच पर्यावरणाच्या मुळावर उठल्याने ह्या सर्वांना निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे .
मीरा भाईंदर महापालिकेतील अधिकारी , लोकप्रतिनिधी , ठेकेदार आदींवर पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे अनेक गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत . तर अनेक तक्रारी गुन्हे दाखल होण्यासाठी प्रलंबित आहेत . तसे असून देखील महापालिका मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आघाडीवर आहे .
महापालिकेने शहरातील मलमूत्र व सांडपाणी बेकायदेशीरपणे थेट खाडी आणि कांदळवनात सोडलेले असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी आधीच पालिकेच्या ह्या जलप्रदूषणास अभय देत आले आहेत . खाडी व खाडी पात्रात कांदळवणाची तोड करून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भरीव करून अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत . त्यावर कोणतीच यंत्रणा कारवाईस तयार नाही . तर पालिकेवणे खाड्याना चक्क नाले ठरवून त्यासाठी कांदळवन सेल आणि एमसीझेडए मार्फत नाले बांधकामासाठी मंजुऱ्या सुद्धा मिळवण्याचा प्रकार चालवला आहे .
पालिकेने उत्तन नका ते पाली पर्यंतची नैसर्गिक नवीखाडी हि चक्क नाला म्हणून नमूद केली आहे . वास्तविक सदर खाडी हि समुद्राला मिळणारी असून या ठिकाणी खाडीपात्रात दाट कांदळवन आहे . ह्या खाडी पात्रात पालिकेने बेकायदेशीर सांडपाणी सोडले असून पालिकेच्या आशीर्वादाने येथे कांदळवन तोडून भराव व बांधकामे झाली आहेत . खाडी चा नाला सांगून या ठिकाणी काँक्रीटच्या भिंती उभारून पक्का नाला करण्याचा प्रस्ताव पालिकेने एमसीझेडएमए कडे दिला आहे .
मीरारोडच्या कनकिया येथील संत थॉमस शाळा ते खाडी पर्यंतचा नाला पालिकेने मंजुरीसाठी एमसीझेडएमए कडे दिला होता . वास्तविक ह्या ठिकाणी पूर्वीपासून कांदळवन होते आणि ते नष्ट केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत . तरी देखील पालिकेने कोणतीही परवानगी नसताना आधीच कांदळवनात आधी कच्चा आणि नंतर काँक्रीटचा पक्का नाला बांधला आहे .
भाईंदर पश्चिमेच्या क्रांतीनगर ते बजरंग नगर आणि ओंसई कॉम्प्लेक्स ते जयअंबे नगर व वसई खाडी पर्यंत देखील दोन पक्के काँक्रीट नाले बांधण्याचा पालिकेने प्रस्ताव दिला आहे . ह्या ठिकाणी देखील नैसर्गिक खाडी प्रवाह असून येथे मोठमोठी कांदळवनाची झाडे आहेत . अनेक झाडे माफियांनी तोडून येथे बेकायदेशीर भराव करून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत . परंतु त्यावर कारवाई न करता आता कांदळवन व खाड्याच नष्ट करून काँक्रीट नाले बांधण्याचा घाट आहे .
मीरारोडच्या संत जोसेफ शाळा ते सृष्टी पूल पर्यंतचा परिसर हा जाफरी खाडी व खाडी पात्रचा परिरसर असून याठिकाणी कांदळवनाची मोठमोठी झाडे आहेत . काही झाडे तोडण्यात आली असून भराव व बांधकामे केली गेली आहेत . तसे असताना ह्या ठिकाणी खाडी व कांदळवन नष्ट करून काँक्रीटचा नाला बांधण्याचा घाट पालिकेचा आहे . धक्कादायक बाब म्हणजे एमसीझेडएमएच्या २७ व २८ ऑक्टॉबर रोजी झालेल्या बैठक क्रमांक १४७ मध्ये ह्यातील उत्तनची नवीखाडी वगळता अन्य ४ ठिकाणी नाले बांधण्याची परवानगीच अटीशर्तींची पूर्तता करण्याच्या अटीवर देण्यात आली आहे . त्यासाठी सदर चार ठिकाणी कांदळवन नसून ५० मीटरच्या बफर झोन असल्याचा कांदळवन सेलच्या पाहणी अहवालाचा हवाला देण्यात आला आहे . ह्या प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता .
स्टॅलिन दयानंद ( संचालक, वनशक्ती ) - खाड्याना नाले दाखवून पक्के नाले बांधकामास मंजुरी देणे अतिशय गंभीर बाब आहे . ह्या मुळे आजूबाजूचे कांदळवन आणि नैसर्गिक खाडी व पात्र नष्ट होणार आहे . परंतु अनधिकृत बांधकाम करणारे व बिल्डर आदींच्या फायद्यासा ठी आणि करोडो रुपयांचे ठेके काढण्यासाठी महापालिका हा प्रकार असताना वास्तविक कांदळवन सेल आणि एमसीझेडएमए ह्यांनी पालिकेवर गुन्हे दाखल करून झालेले उल्लंघन हटवण्याचे निर्देश दिले पाहिजे होते . पण ह्यांचे संगनमत असल्याचे ह्या प्रकाराने स्पष्ट झाले आहे . ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित केले पाहिजे .