मीरा-भाईंदर महापालिकेचा यंदा शहरातील चौक स्वच्छ करून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 07:30 PM2021-10-26T19:30:08+5:302021-10-26T19:30:18+5:30
यंदा मात्र चौक व बेट हे स्वच्छ करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने यंदाची दिवाळी हि शहरातील चौक स्वच्छ करून स्वच्छतेची दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे . पण स्वच्छतेसह १ हजार पणत्या लावण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
शहरात अनेक चौक व वाहतूक बेट असून त्याच्या नियमित स्वच्छता - देखभाली कडे पालिका व नगरसेवक फारसे लक्ष देत नाहीत . त्यामुळे नियमित सफाई अभावी चौक - बेट हे अस्वच्छ झालेले आहेत . पण - गुटख्याच्या पिचकाऱ्या पासून धूळ व घाणीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
यंदा मात्र चौक व बेट हे स्वच्छ करण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. त्यासाठी उपायुक्त अजित मुठे यांनी पुढाकार घेतला असून महापालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना चौक स्वच्छतेचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . साफसफाईची स्वतः मुठे हे पाहणी करत आहेत.
यंदा स्वच्छतेची दिवाळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व चौक हे दिवाळीत दिव्यांच्या झगमगाटात उजळून काढण्याचा मांस पालिकेचा आहे . त्यासाठी स्थानिक रहिवाश्यांना आवाहन करून त्यांच्या मार्फत रांगोळ्या काढण्यात येणार असून सरासरी १००० पणत्या लावण्यात येणार आहेत असे उपायुक्तांनी सांगितले . या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.