मीरा भाईंदर महापालिके तर्फे दिव्यांगांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 07:09 PM2019-12-04T19:09:00+5:302019-12-04T19:14:28+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.
मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. पालिकेने यंदा ५० दिव्यांगांना प्रत्येकी २० हजारांचे सहाय्य केले असून जागतिक दिव्यांग दिवशी काहींना धनादेशाचे वाटप करुन विविध योजनांची माहिती देण्यात आली.
भाईंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरभवन येथे मंगळवारी सायंकाळी पालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांच्या अनुदानाचे धनादेश महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, समाज विकास अधिकारी दिपाली जोशी, नगरसेविका विविता नाईक, हेमा बेलानी, अनिता मुखर्जी, मीना कांगणे आदी उपस्थित होते.
पालिकेने आता पर्यंत ५० दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान दिलेले आहे. तर एका दिव्यांग महिलेने व्यवसायासाठी काढलेल्या २ लाखांच्या कर्जा पोटी १ लाख रुपयांचे अनुदान दिलेले आहे. यावेळी दिव्यांगांच्या मनोरंजना करीता संगीताचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. पालिकेच्या वतीने राबवल्या जाणाराया योजनांची माहिती देण्यात आली.