शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन मीरा भाईंदर महापालिकेचा भरती घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:21 PM2020-03-16T13:21:23+5:302020-03-16T13:21:29+5:30
महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत ठोक मानधनावर औषध निर्माण अधिकारी नेमताना शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन पद भरल्याचे समोर आले आहे. त्यातच सदर पदावर पात्र ठरवलेल्या उमेदवार ह्या पालिकेच्या मुलाखत घेणाराया एका वैद्यकिय अधिकारायाच्या नातलग असल्याने हा निवड घोटाळा केला गेल्याचा आरोप होत आहे.
शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक आयुक्तांच्या ५ जुन २०१४ रोजीच्या आदेशा नुसार कंत्राटी पदे भरते वेळी अनुभवा बाबत फक्त शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गतचा अनुभव ग्राह्य धरला जावा असे स्पष्ट केलेले आहे. तसेच औषध निर्माण अधिकारी आदी पदांसाठी मुलाखत १०० गुणांची असेल व कोणत्या गोष्टीसाठी किती गुण असावेत याचा तक्ताच नमुद केलेला आहे. ९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या आरोग्य सेवा संचालकांच्या पत्रात देखील शासकिय सेवेत काम केलेल्यास प्राधान्य दिले जावे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे.
महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. त्यात मुलाखत किती गुणाची असेल ? कोणत्या विषयासाठी किती गुण असतील आदी माहितीच दिली गेली नाही. निवडीच्या प्राधान्य अर्हता मध्ये देखील शासकिय सेवेतील कामाच्या अनुभवास प्राधान्य असे सोयीस्कर टाळत केवळ कामाचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी मुलाखत घेतेवेळी प्रत्यक्षात ५० गुणांचीच परिक्षा घेतली.
या मुलाखतीमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी सोनाली दत्तात्रय वराडे यांची निवड करण्यात आली. ५० गुणां पैकी २८.४७ गुण देण्यात आले. त्यातही अनुभवासाठीचे ५ पैकी ५ गुण दिले गेले. वास्तविक सोनाली वराडे यांना कोणताही शासकिय सेवेतील कामाचा अनुभव नसताना त्यांना पैकीच्या पैकी गुण दिले गेले. मुलाखती वेळी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यासह अन्य सदस्यां मध्ये पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर हे उपस्थित होते. सदस्य निवड समितीचे आरोग्य सेवेचे उपसंचालक मात्र नव्हते.
महत्वाचे म्हणजे औषध निर्माण अधिकारी पदावर निवड केली गेलेल्या सोनाली वराडे ह्या डॉ. बालनाथ चकोर यांच्या नातलग आहेत. वराडे ह्या डॉ. चकोर यांच्या नातलग असताना ते मुलाखत घ्यायला थांबले व गुण दिले. ज्या विभागातील हे पद भरले गेले त्या विभागाचे डॉ. चकोर हेच प्रमुख आहेत. एकुणच डॉ. चकोर यांच्या नातलगाची वर्णी लागावी यासाठी शासनाचे निर्देश धाब्यावर बसवुन मुलाखत व निवडीचा संगनमताने सर्व खटाटोप केला गेल्याचा आरोप श्रमजीवी कामगार संघटनेने कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी केला आहे. सदर नियुक्ती रद्द करुन डॉ. चकोर सह संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पटेल यांनी केली आहे. डॉ. प्रमोद पडवळ यांनी मात्र, यात नातलगाचा विषय नाही, खाजगी सेवेचा अनुभव असला तरी नियुक्ती करता येते असे म्हटले आहे.