मीरा-भाईंदर महापालिका ३० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार; पर्यटनासाठी १ बस घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 08:02 PM2022-07-11T20:02:54+5:302022-07-11T20:03:01+5:30
आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी पर्यटन बस सुरु करण्याची संकल्पना जाहीर केली होती.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका ३० मिडी आकाराच्या इलेक्ट्रिक बस ठेकेदारा मार्फत खरेदी करणार आहे. तर शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी १ मिनी इलेक्ट्रिक बस महापालिका थेट खरेदी करणार आहे. इलेक्ट्रिक बसमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाकडून महापालिकेस राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमा अंतर्गत इलेक्ट्रिक बस खरेदी साठी १४ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे . त्यातून ८० लाख रुपयांची मिनी इलेक्ट्रिक बस हि महापालिका थेट खरेदी करणार आहे . ह्या बसचा वापर शहरातील पर्यटन स्थळ दर्शन साठी केला जाणार आहे.
आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी पर्यटन बस सुरु करण्याची संकल्पना जाहीर केली होती. त्या अनुषंगाने हि मिनी बस पर्यटन स्थळ दर्शनसाठी उपयोगात आणली जाणार आहे .या शिवाय ३० इलेक्ट्रिक बस खरेदी हि ठेकेदाराच्या माध्यमातून केली जाणार आहे. ह्या मिडी आकाराच्या बस खरेदीसाठी ठेकेदाराला १३ कोटी २० लाख दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रति बस सुमारे ४५ लाख रुपयांचे अनुदान पालिका देणार आहे.
जीसीसी तत्वावर ह्या ३० बस चालवल्या जाणार असून त्याचा देखभाल - दुरुस्ती , कर्मचारी पगार आदी सर्व खर्च ठेकेदारच करणार आहे. प्रति बस सुमारे ४५ लाख अनुदान सुरवातीलाच ठेकेदाराला पालिका देणार असून त्या शिवाय प्रति किलो मीटर प्रमाणे बस चालवण्याचा खर्च सुद्धा पालिका ठेकेदारास देणार आहे. ह्या ३१ बस साठी निविदा काढण्यास सोमवारी आयुक्त ढोले यांनी मंजुरी दिली.
इलेक्ट्रिक बस मुळे प्रदूषण होणार नाही व हवेची गुणवत्ता चांगली राहील. पर्यटनासाठी आकर्षक स्वरूपात १ बस सुरु केली जाईल. तर ३० मिडी बस मुळे शहरातील अंतर्गत भागात नागरिकांना आणखी बस सुविधा मिळून त्यांना चांगली परिवहन सेवा मिळणार आहे. शिवाय मेट्रो सुरु झाल्यावर त्या प्रवाश्याना सुद्धा इलेक्ट्रिक बसचा फायदा होणार आहे. दिलीप ढोले ( आयुक्त )