गणेशोत्सव मंडळांसाठी मीरा-भाईंदर मनपा एक खिडकी योजना करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:38+5:302021-08-20T04:46:38+5:30
मीरारोड : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिका सर्व सहा ...
मीरारोड : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिका सर्व सहा प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करणार आहे.
१९ ऑगस्ट रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व प्रभागाचे प्रभाग अधिकारी, पोलीस प्रशासन यांची सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित केली होती. त्यात मंडळांना सार्वजनिक श्रीगणेश उत्सवासाठी महानगरपालिका, पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाची परवानगी घेणे बंधनकारक असून, परवानगीशिवाय मंडप आदी कामे कोणी करत असल्यास तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले.
मंडळांच्या परवानगीकरिता वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या सर्व १ ते ६ प्रभाग समितीच्या कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकारी यांना आयुक्तांनी दिले. एक खिडकी योजनेत संबंधित प्रभागातील सर्व गणेश मंडळांना मंडपापासून सर्व आवश्यक परवानग्या महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन दलमार्फत देण्यात येणार आहेत. त्यामुळे मंडळांनी परवानगीसाठी संबंधित प्रभाग कार्यालयात अर्ज करायचा आहे. कोरोना नियमांचे पालन करून घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.