मीरा-भाईंदर मनपाचा कौतुक सोहळा गडबडीच्या फेऱ्यात; ज्यांनी सोन्याचा हार काढून दिला त्यांनाच डावललं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:10 PM2021-09-30T17:10:04+5:302021-09-30T17:14:55+5:30
...परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज माध्यमातून होत आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका म्हणजे गडबड घोटाळ्यांची महापालिका, अशी ख्याती झालेली आहे. येथे कल्पनेत नसलेलेसुद्धा घोटाळे होण्याचे प्रकार घडत असतात. नुकताच महापौर, आयुक्त आदींनी दोन पालिका कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव वेळी गणेशाच्या गळ्यात राहिलेला सोन्याचा हार परत दिला, म्हणून सत्कार केला. पण विसर्जनस्थळी ज्या कार्यकर्त्यांनी तो हार काढून दिला त्यांना मात्र डावलण्यात आल्याची टीका होत आहे.
भाईंदर पश्चिमेच्या नगरभवन येथील मांदली तलाव येथे यंदाच्या गणेशोत्सवात मीरा-भाईंदर महापालिकेकडून मूर्ती स्वीकृती केंद्र सुरू केले होते. १७ सप्टेंबर, अनंत चतुर्थीच्या रात्री विसर्जनास आलेल्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचा हार हा कल्पना चौरसिया व कुटुंबीय विसरून गेले होते. त्यांच्या लक्षात आल्यानंतर हार शोधत परतल्या. त्यांना हा हार परत केला म्हणून, वैद्यकीय विभागाच्या परिचारिका सीमा साळुंखे व सफाई कर्मचारी मंजुळा स्वामी यांचा महापौर ज्योत्स्ना हसनाळे , आयुक्त दिलीप ढोले आदींनी सत्कार केला. त्याची प्रसिद्धी पत्रके काढून त्यावर बातम्यासुद्धा झळकल्या.
परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज माध्यमातून होत आहे.
मांदली तलावात भाईंदर गावातील स्थानिक तरुण हे गेल्या अनेक वर्षांपासून गणपती विसर्जन करतात. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींच्या गळ्यातील हार, फुले, कंठी वा अन्य साहित्य आदी बाहेर काढून मग विसर्जन केले जाते.
मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, १७ सप्टेंबर , अनंत चतुर्थीला रात्री कल्पना व कुटुंबीय त्यांची गणेश मूर्ती घेऊन विसर्जनासाठी तलावाच्या ठिकाणी आले असता रुचित कोत्रे, शुभम ठाकूर व महेश देवळीकर यांनी मूर्ती विसर्जनासाठी तलावात नेण्याआधी गळ्यातील हार आदी काढले. रुचीत ते नेहमी प्रमाणे बाजूला ठेवत असताना हार चांगला दिसतो म्हणून पालिकेच्या त्या उपस्थित महिला कर्मचाऱ्याने तो मागून घेतला व स्वतःकडे ठेवला. कार्यकर्त्यांना वा त्या महिला कर्मचाऱ्यालादेखील ती गणपतीच्या गळ्यातील कंठीच वाटली, तो सोन्याचा हार आहे याचा त्यांना मागमूसदेखील नव्हता. ते सर्व नेहमी प्रमाणे गणपतीच्या गळ्यातील कंठीच समजत होते.
परंतु काही वेळाने कल्पना ह्या गणेश मूर्तीच्या गळ्यात राहिलेला सोन्याचा हार शोधत परत आल्या असता त्यावेळी कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी एक हार पालिका कर्मचारी महिलेकडे असल्याचे लक्षात आल्याने तो बघितला असता कल्पना यांनी ओळखला. त्या पालिका कर्मचारी महिलेनेदेखील लगेच तो हार कल्पना यांच्याकडे सुपूर्द केला. कल्पना यांनी हार मिळाल्याने सर्वांचे आभार मानले. तसेच विसर्जन व्यवस्थेतील त्या कार्यकर्त्यांसह उपस्थित पोलीस अधिकाऱ्यां सोबत छायाचित्रे काढली.
पालिकेने केवळ त्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला त्या बद्दल मंडळाचा विरोध नाही. पण ज्या कार्यकर्त्यांनी तो हार परत मिळण्यात महत्वाची भूमिका निभावली त्यांची दखलसुद्धा पालिकेने घवतली पाहिजे होती असे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.
या प्रकरणी आयुक्त दिलीप ढोले म्हणाले, मी स्वतः याची माहिती घेईन आणि त्या कार्यकर्त्या तरुणांचाही सत्कार केला जाईल.