मीरा भाईंदर महापालिकेची 'माझे घर माझ्या २ कचरा कुंड्या' मोहीम
By धीरज परब | Published: October 24, 2022 05:39 PM2022-10-24T17:39:52+5:302022-10-24T17:40:23+5:30
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत ओला व सुका कचरा हा वेगळे करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक करण्यात आले आहे.
मीरारोड - ओला व सुका कचरा वेगळा करणे प्रत्येक नागरिकास कायद्याने बंधनकारक असून कचरा वर्गीकरण केल्यास त्याचे शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे सोपे जात असल्याने मीरा भाईंदर महापालिकेने शहरात माझे घर माझ्या दोन कुंड्या अशी मोहीम सुरु केली आहे .
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत ओला व सुका कचरा हा वेगळे करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक करण्यात आले आहे. कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून उत्तन येथे तर कचरा प्रक्रिया न केल्याने कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. कचऱ्या मुळे तेथील शेती नष्ट झाली असून पाणी सुद्धा प्रदूषित झाले आहे . नियमित लागणाऱ्या आगी व दुर्गंधी मुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा संताप स्थानिकांनी सातत्याने व्यक्त केला आहे.
महापालिका प्रशासनाने सातत्याने नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची आवाहन केले आहे . अनेकवेळा कचरा वर्गीकरण केला नसेल तर तो न उचलण्याची कार्यवाही केली गेली आहे . ओला व सुका कचरा वेगळा न केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे . ओला कचरा वेगळा केल्यास त्या पासून खत आदी निर्मिती करता येते. तर सुक्या कचऱ्या पासून जळाऊ इंधन बनवण्या सह विविध प्रक्रिया करता येते.
नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी प्रत्येकाने घर , दुकान , हॉटेल , फेरीवाला वा अन्य व्यवसाय ठिकाणी कचऱ्याचे दोन स्वतंत्र डबे ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे . ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात तर सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात गोळा करावे . आपल्या शहरात घन कचरा व्यवस्थापन मोहीम यशस्वी करण्या करीता नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्या घरातील ओला आणि सुका कचऱ्याच्या, हिरव्या आणि निळ्या रंगाचा कुंड्या सोबत फोटो काढून जास्तीत जास्त सोशल मीडियावर पोस्ट करावे. त्यासाठी पालिकेने हरागिला सुकानीला एमबीएमसी आदी हॅशटॅगचा वापर करावा असे आवाहन नागरिकांना केल्याचे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले . ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा पवार यांनी दिला आहे.