मीरा - भाईंदर महापालिकेची 181 कोटींची करवसुली रखडलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:03 AM2021-04-06T01:03:37+5:302021-04-06T01:03:46+5:30
थकबाकीदारांना ११.६५ कोटींचे व्याज माफ; प्रामाणिक करदात्यांना मात्र ठेंगा
- धीरज परब
मीरा रोड : मीरा - भाईंदर महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि मोकळ्या जागांवरील कर असे मिळून ३६५ कोटी ३५ लाखांपैकी केवळ १८३ कोटी ८८ लाख रुपये वसूल केले आहेत. १८१ कोटी ४७ लाख रुपये कर वसूल झाला नसताना ज्या करदात्यांनी वेळेत प्रामाणिकपणे कर भरला त्यांना मात्र ५० टक्के सवलत देण्यास प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. मात्र, वर्षांनुवर्ष कर थकवणाऱ्या थकबाकीदारांना तब्बल ११ कोटी ६५ लाख रुपये माफ करून त्यांचा प्रचंड फायदा करून दिला आहे .
मालमत्ता कर व मोकळ्या जागांवरील कर बुडवणाऱ्या थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून तब्बल ७५ टक्के व्याज माफ केले आहे. मालमत्ता कर वसुलीत थकबाकीदारांचे मात्र अभय योजनेच्या नावाखाली तब्बल सात कोटी ३३ लाख रुपये, तर मोकळ्या जागांवरील करांची थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांचे तब्बल चार कोटी ३२ लाख रुपये माफ केले आहेत. एकूण ११ कोटी ६५ लाखांची माफी थकबाकीदारांना देऊन त्यांचा प्रचंड आर्थिक फायदा करून दिला तसेच इतक्या मोठ्या उत्पन्नाच्या रकमेवर कायमचे पाणी सोडले. करबुडव्या थकबाकीदारांची इतकी मोठी रक्कम माफ करताना दुसरीकडे प्रामाणिक करदात्यांना मात्र निव्वळ घरपट्टीत सुद्धा ५० टक्के सवलत देण्यास सत्ताधारी भाजप व प्रशासनाने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे काेराेनाकाळात नागरिकांच्या ताेंडाला पाने पुसल्याची भावना आहे.
मालमत्ताकराची वसुली १६१ कोटी
मीरा - भाईंदर महापालिकेच्या नोंदी एकूण मालमत्ता तीन लाख ६८ हजार ५०१ इतक्या आहेत. घरपट्टी, वृक्षकर, शासन व महापालिकेचा स्वतंत्र शिक्षण कर, अग्निशमनकर, मलप्रवाह सुविधा कर, घनकचरा शुल्क हे ७ कर महापालिका एकत्रितपणे मालमत्ताकराच्या देयकातून वसूल करते.
२०२० - २०२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या अनुषंगाने २७१ कोटी रुपयांची एकूण मागणी होती. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत १६१ कोटी रुपयांची करवसुली केली आहे. म्हणजेच तब्बल १०० कोटी वसुली करता आलेली नाही. या १०० कोटींमध्ये ४० कोटी अशी रक्कम आहे जी वसूल होऊ शकत नाही, असा दावा कर विभागातील सुत्रांकडून केला जातो.
सत्ताधारी भाजप आणि पालिकेने मालमत्ता थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवून व्याज ७५ टक्के माफ केले आहे. मालमत्ताकर वसुलीत अभय योजनेद्वारे २६ कोटी ८९ लाख २१ हजार ६३२ इतकी वसुली झाली आहे. परंतु, ही थकबाकी वसूल करताना थकबाकीदारांचे तब्बल सात कोटी ३३ लाख रुपये माफ केले आहेत.
घरपट्टीबाबतचा ‘ताे’ प्रस्ताव पाठवलाच नाही
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन केले होते. त्यावेळी सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करून मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना घरपट्टीत ५० टक्के कर सवलत देण्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यावेळी आर्थिक नुकसानीचे कारण पुढे करून ठराव शासनाकडे पाठवला. दुसरीकडे मालमत्ता थकबाकीदार व मोकळ्या जमिनीवरील कराचे थकबाकीदार यांना थकीत व्याजावर तब्बल ७५ टक्के माफी देताना तो प्रस्ताव मात्र शासनाकडे पाठवला नाही.
मोकळ्या जागांवरील कराची वसुली २२ कोटी ८८ लाख
महापालिकेतील मोकळ्या जागांवरील कराचे एकूण खातेदार ५०९ इतके आहेत . मोकळ्या जागांवरील कर रकमेसह थकबाकी आणि व्याज मिळून १०० कोटींच्या वर मागणी होती. वास्तविक मालमत्ता कर विभागाने बड्या बिल्डरांकडून कर व थकबाकी वसुली करण्यात उदासीनता दाखवली होती. नगररचना विभागाकडे पुन्हा या कराची जबाबदारी सोपवल्यावर थकीत प्रकरणांची छाननी केली असता एकूण मागणीची रक्कम ९४ कोटी ३५ लाख इतकी आली.
नगररचना विभागाने मोकळ्या जागांवरील कर वसुली २२ कोटी ८८ लाख रुपये इतकी केली आहे. एकूण वसुलीपैकी अभय योजनेतील थकबाकीतून १२ कोटी ११ लाख रुपये समाविष्ट आहेत. तर या बड्या थकबाकीदारांना तब्बल चार कोटी ३२ लाख रुपयांची व्याज माफी पालिकेने दिली आहे.