मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 07:33 PM2020-08-17T19:33:35+5:302020-08-17T19:34:17+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले . तर आमच्या पोटाला चिमटा काढणाऱ्या ठेकेदाराला काढून टाका. बससेवा आम्ही कर्मचारीच पूर्वी सारखी चालवू अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली .
मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा चालवण्यासाठी मेसर्स भागीरथी या ठेकेदारास ठेका दिला आहे . सदर ठेक्यात बस चालक , वाहक व अन्य असे मिळून सुमारे 430 कर्मचारी कार्यरत आहेत. ठेकेदार नवीन असल्या तरी बहुतांश कर्मचारी हे गेल्या 10 ते 15 वर्षां पासून परिवहन उपक्रमात कार्यरत आहेत.
मार्च अखेरीस कोरोना संसर्गाचा मुळे परिवहन सेवा बंद करण्यात आली . त्या नंतर पालिकेतील कर्मचाऱ्यांना ने - आण करणे तसेच कोरोना संसर्गा मुळे मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना वसई रेल्वे स्थानका पर्यंत सोडण्यासाठी बस सेवेचा वापर केला गेला . त्यासाठी ठेकेदाराने ठराविक कर्मचारी कामावर ठेवले होते व त्यांना पगार दिला .
परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले नाही म्हणून त्यांना मात्र पगार दिला गेला नाही . तर आम्हाला देखील कामावर बोलवा तसेच मार्च पासून चा पगार द्या अशी मागणी कर्मचाऱ्यां कडून सातत्याने केली जात होती . पालिका प्रशासना कडून देखील आश्वासन दिले जात होते .
पण मार्च पासून आज 5 महिने झाले तरी कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त दालना बाहेर धरणे धरले . आमदार गीता जैन यांनी आयुक्त डॉ . विजय राठोड यांच्या सोबत चर्चा केली असता तेथे ठेकेदार पण उपस्थित होता . महापालिकेने आपणास पैसे दिल्यास पगार देऊ असा पवित्र ठेकेदाराने कायम ठेवला .
यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत घरची झालेली हलाखीची स्थिती कथन केली . उसने मागून घर चालवत असून भाडे भरले नाही म्हणून घर रिकामे करण्याची पाळी आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले . आधीच ठेकेदाराने विविध भत्ते आदी दिले नसून विशिष्ट मर्जीतील कर्मचाऱ्यांनाच कामावर घेऊन त्यांना लॉक डाऊन काळात काम दिले गेले पण अन्य कर्मचाऱ्यांना विशिष्ट हेतूने काम देण्या पासून डावलण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला .