मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचे ६ कोटी ३० लाख मिळणार
By धीरज परब | Published: April 4, 2023 12:20 PM2023-04-04T12:20:57+5:302023-04-04T12:21:09+5:30
मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवर १४६८ पदे भरलेली आहेत.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगा नुसार थकबाकीचा दुसरा हप्ता म्हणून ६ कोटी ३० लाख ७३ हजार इतकी रक्कम पालिका तोजोरीतून दिली जाणार आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवर १४६८ पदे भरलेली आहेत. अधिकारी व कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला असून ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन सरकारने त्यास मान्यता दिली होती . त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाबाबत अतिप्रदान झाल्याबाबतचे हमीपत्र घेण्यात आले व ऑक्टोबर २०२० पासून त्यानुसार वेतन अदा करण्यात येते.
७ वा वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीची रक्कम पुढील ५ वर्षात ५ समान हफ्त्यात नविन परिभाषित अंशदान कर्मचाऱ्यांना रोखीने व भविष्य निर्वाह निधीमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये देण्यासाठी पहिला हप्ता २०२१ सालात जमा करण्यात आला होता . पहिल्या हप्त्याची रक्कम हि ५ कोटी ८१ लाख ४३ हजार ६९० इतकी होती. मध्यंतरी पालिकेच्या तिजोरीत चणचण भासल्याने दुसरा हप्ता गेल्यावर्षी अपेक्षित असताना मिळाला नव्हता . यंदा पालिकेची चांगली मालमत्ता कर वसुली तसेच मुद्रांक शुल्कच्या फरकाची रक्कम आल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला.
सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना ५ कोटी ८१ लाख ४३ हजार इतकी दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार असून ती त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणार आहे . तर निवृत्त वेतनधारकांना ४९ लाख २९ हजार ८१६ इतकी रक्कम रोखीने दिली जाणार आहे . सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून २००५ पूर्वी सेवेत दाखल झालेल्याच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये रक्कम जाणार आहे अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली. ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळणार असल्याने अधिकारी - कर्मचारी खुश झाले आहेत . त्यामुळे ते अधिक प्रामाणिकपणे काम करतील अशी अपेक्षा जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे .