क्षयरोग मुक्त भारतासाठी राज्यातील क्षयरोग जिल्हे व महापालिकांना मीरा भाईंदर महापालिका पॅटर्नचे मार्गदर्शन

By धीरज परब | Published: July 6, 2023 08:44 PM2023-07-06T20:44:42+5:302023-07-06T20:44:56+5:30

क्षयरोग मुक्त भारत साठी मीरा भाईंदर महापालिकेचा पॅटर्न चर्चेत आला आहे . 

Mira Bhayander Municipal Pattern Guidance for Tuberculosis Districts and Municipalities in the State for Tuberculosis Free India | क्षयरोग मुक्त भारतासाठी राज्यातील क्षयरोग जिल्हे व महापालिकांना मीरा भाईंदर महापालिका पॅटर्नचे मार्गदर्शन

क्षयरोग मुक्त भारतासाठी राज्यातील क्षयरोग जिल्हे व महापालिकांना मीरा भाईंदर महापालिका पॅटर्नचे मार्गदर्शन

googlenewsNext

मीरारोड - २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत अभियानात संपूर्ण राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिका पॅटर्न चे मार्गदर्शन पालघर, रायगड , ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील ७ महापालिकांच्या क्षयरोग अधिकारी यांनी घेतले . क्षयरोग मुक्त भारत साठी मीरा भाईंदर महापालिकेचा पॅटर्न चर्चेत आला आहे . 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरणाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. क्षयरोग मुक्त भारतचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सरकारी वैद्यकीय क्षेत्रासह  खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा सहभाग महत्वाचा आहे . 

मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे ,   शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर , पर्यवेक्षक राजेंद्र पवार , परमेश्वर भादेकर, ३ क्षयरोग पथकातील  भूषण किणी , सचिन जाधव , दीपक पाटील , रोहित गोडसे , लॅब पर्यवेक्षक किरण आमले , सुनील ननावरे सह आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी , परिचारिका , प्रसवीका , आशा वर्कर  आदींनी मिळून क्षयरोग मुक्त भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत . महापालिके कडे तपासणी साठी चार यंत्रे आणि १० क्षयरोग तपास व निदान केंद्र आहेत .  

सदर अधिकारी - कर्मचारी यांनी केवळ महापालिका आरोग्य केंद्र , रुग्णालया पुरते मर्यादित न राहता खाजगी क्षेत्रातील दवाखाने , रुग्णालये , लॅब यांना सुद्धा मोहिमेत सहभागी करून घेतले आहे . पालिकेची पथके त्यांच्या कडे सतत पाठपुरावा करून समन्वय राखतात . त्यामुळेच सुमारे केंद्रीय टीबी निदान ऍप मध्ये शहरातील १२५० खाजगी  रुग्णालय , दवाखाने , लॅब आदींची नोंदणी केली आहे . सदर खाजगी वैद्यकीय संस्थेने क्षयरोग निदान केले तर त्यांना प्रति रुग्ण ५०० तसेच रुग्ण बरा केल्यावर ५०० रुपये दिले जातात . 

२०२२ साली  शहरातील सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्राने १५५० क्षयरोगी निदान उद्दिष्टा पैकी १२५१ रुग्ण शोधले . त्याचे प्रमाण ८४ टक्के इतके होते . तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रातून १२५० उद्दिष्ट असताना १२९६ क्षयरोग रुग्ण शोधण्यात आले . उद्दिष्टा पेक्षा जास्त म्हणजेच १०४ टक्के इतके प्रमाण होते . त्यामुळेच राज्यातील ८० क्षयरोग  जिल्हे क्षेत्रातून मीरा भाईंदर महापालिकेला १०० पैकी ९२ . ५२ गुण मिळत प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते . 

२०२३ सालच्या जानेवारी ते जून पर्यंतच्या आकडेवारी शहरातील खाजगी वैद्यकीय क्षेत्राने ७०० पैकी ६५२ रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे . तर सार्वजनिक क्षेत्राने ६५० पैकी ५६२ रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट गाठले आहे . सध्या शहरात १५९० क्षयरोग रुग्ण उपचार घेत आहेत . 

महानगरपालिकेने खाजगी वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरलेले धोरण हे क्षयरोग मुक्त भारत अभियानात एक यशस्वी पॅटर्न ठरला आहे . त्यातूनच राज्यातील क्षयरोग विभागणीय जिल्हे व महापालिकांनी मीरा भाईंदर महापालिकेचा पॅटर्न समजून घेऊन त्याची आपापल्या भागात अमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या जात आहेत . 

त्यातूनच मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात या बाबत मार्गदर्शन बैठक पार पडली . खाजगी क्षेत्राचा सहभाग कशाप्रकारे वाढविता येईल याबाबतचे मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी केले. या वेळी राज्याचे स्टेट टेक्निकल सपोर्ट युनिट प्रमुख डॉ. राजाभाऊ येवले,  जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. अनिरुद्ध कडू, डॉ. अनिरुध्द पाठक, डॉ. अविनाश जाधव, डॉ. नेहा नलावडे, उपायुक्त संजय शिंदे,   शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर तसेच ठाणे , पालघर व रायगड जिल्हा क्षयरोग अधिकारी व कर्मचारी तसेच ठाणे जिल्ह्यातील ७ महापालिकांचे शहर क्षयरोग अधिकारी उपस्थित होते . 

क्षयरोगची लागण झालेले रुग्ण प्राधान्याने शोधण्यासह त्यांच्या सहवासातल्या लोकांची सुद्धा तपासणी व ६ महिन्याचे प्रतिबंधात्मक उपाय केले जातात . लोकल तसेच गर्दीच्या ठिकाणी क्षयरोगींना मास्क घालण्यास सांगितले जाते . डायबिटीस , एचआयव्ही चाचणी केली जाते . त्यांना पोषक आहारा साठी शासना कडील ५०० रुपये भत्ता दरमहा दिला जातो . क्षयरोग चाचणी पासून उपचार आदी सर्व मोफत केले जाते . त्यामुळे शहरातील क्षय रोग बरे होण्याचे ८६ टक्के आहे  असे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले . 

खाजगी क्षेत्रातील डॉक्टर व कर्मचारी यांना सोबत घेण्यासह योग्य मार्गदर्शन करत समन्वय  राखला जातो . त्यांना आवश्यक सोयी सुविधा दिल्या जातात . पालिकेचे अधिकारी - कर्मचारी क्षयरोग निर्मूलना साठी प्रभावी कार्य व पाठपुरावा करत असल्याने मीरा भाईंदर क्षयरोग मुख्य भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे डॉ . संभाजी पानपट्टे म्हणाले . 

Web Title: Mira Bhayander Municipal Pattern Guidance for Tuberculosis Districts and Municipalities in the State for Tuberculosis Free India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.