मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या पहिल्या ४ इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांच्या सेवेत
By धीरज परब | Published: October 31, 2023 07:37 PM2023-10-31T19:37:11+5:302023-10-31T19:38:39+5:30
जानेवारी महिन्या पर्यंत सर्व इलेक्ट्रिक बस पालिका परिवहन सेवेत दाखल होणार आहेत .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झालेल्या पहिल्याच ५ इलेक्ट्रिक बस पैकी ४ बस नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत . पर्यावरणपूरक ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बस पहिल्यांदाच पालिका ताफ्यात आल्या असून आणखी ५२ इलेक्ट्रिक बस टप्याटप्याने येणार आहेत.
१५ व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेला ८१ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे . त्यातील २८ कोटी १५ लाख इतके अनुदान हे ५७ ई बस खरेदीसाठी महापालिका वापरत आहे . हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ई बस खरेदी केल्या असून ५७ ई बस पैकी ३२ मिडी आकाराच्या तर १५ स्टॅंडर्ड आकाराच्या विना वातानुकूलित बस तसेच १० स्टॅण्डर्ड आकाराच्या वातानुकूलित बस असणार आहेत.
५७ पैकी ५ ई मिडी आकाराच्या बस महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झाल्या असून त्या पैकी ४ बस ह्या प्रवाश्यांच्या सेवेत सुरु करण्यात आल्या आहेत . पालिकेच्या पहिल्या ई बस चे लोकार्पण सोहळा आयुक्त संजय काटकर तसेच आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांच्या हस्ते सोमवारी रात्री घोडबंदर येथील पालिकेच्या नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट बस आगार येथे पार पडला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, प्रशासकीय अधिकारी दिनेश कानगुडे , बस उत्पादक यांचे प्रतिनिधी, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , विभागप्रमुख महेश शिंदे , माजी परिवहन समिती सभापती मंगेश पाटील सह माजी सदस्य आदी उपस्थित होते . त्यांनी बस मधून प्रवास केला . आयुक्तांनी बस चे पहिले तिकीट घेतले .
भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक ते के . डी . एम्पायर ह्या बस मार्ग साठी २ इलेक्ट्रिक बस तर मीरारोड रेल्वे स्थानक पूर्व ते जे. पी. नॉर्थ सिटी या मार्गावर २ इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरवात केली आहे . नवीन बस मुळे प्रवासी सुद्धा आनंदित झाले आहेत . हवेतील प्रदूषण कमी होणार असून पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्या पर्यंत सर्व इलेक्ट्रिक बस पालिका परिवहन सेवेत दाखल होणार आहेत .