क्रिकेट टर्फच्या परवानगी शुल्कात मीरा भाईंदर पालिकेची भरघोस सवलत
By धीरज परब | Published: January 21, 2023 07:59 PM2023-01-21T19:59:04+5:302023-01-21T19:59:36+5:30
एकीकडे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख , उपायुक्त यांच्या कडून कारवाई होत नसताना बेकायदा चालणाऱ्या टर्फ चे परवानगी शुल्क कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला .
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर क्रिकेट टर्फ चालकांनी पालिकेची परवानगी घ्यावी ह्यासाठी प्रशासनाने प्रति चौमी असलेले १ हजार २७० रुपये इतके शुल्क कमी करत आता केवळ १५० रुपये प्रति चौमी इतके केले आहे .
शहरातील अनेक मोकळ्या जागां वर पालिकेची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात बेकायदा क्रिकेट टर्फ उभारून त्याचा व्यवसाय चालवला जात आहे . अनेक टर्फ तर पालिका आरक्षण , कांदळवन व सीआरझेड क्षेत्रात तसेच नाविकास वा इको सेन्सेटिव्ह क्षेत्रात बेकायदा उभारून देखील ठोस कारवाई पालिके कडून होताना दिसत नाही.
सदर टर्फ हे बक्कळ फायदा कमावण्यासाठी उभारले जात असतानाच दुसरीकडे रात्री अपरात्री ह्या टर्फ वर चालणारा गोंधळ - हुल्लडबाजी , ध्वनी प्रदूषण तसेच चालणारे व्यसन आदींच्या तक्रारी सुद्धा होत असतात . दरम्यान सदर टर्फ ना शुल्क आकारून पालिकेचे उत्पन्न वाढवावे ह्या साठी मे २०२१ मध्ये प्रशासनाने कार्यालयीन आदेश काढून टर्फ ना परवानगी देण्यासाठी काही अटीशर्ती तयार केल्या . त्या मध्ये मुख्यत्वे अनामत रक्कम साठी १० हजार व १२७० रुपये प्रति चौमी प्रमाणे शुल्क आकारण्याचे नमूद होते. परंतु तरी देखील पालिकेचे शुल्क भरून परवानगी घेण्याचे टर्फ चालकांनी सपशेल धुडकावून लावले . एकीकडे बक्कळ फायदा कमावत दुसरीकडे पालिकेचे शुल्क भरून परवानगी घेतली जात नसताना देखील पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी मात्र बेकायदा टर्फ ना पाठीशी घालत अर्थपूर्ण संरक्षण दिले.
एकीकडे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख , उपायुक्त यांच्या कडून कारवाई होत नसताना बेकायदा चालणाऱ्या टर्फ चे परवानगी शुल्क कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला . टर्फचे शुल्क १२७० रुपयां वरून कमी करून केवळ १५० रुपये प्रति चौमी इतके आता करण्यात आले आहे . टर्फ चालकांना प्रचंड मोठा आर्थिक दिलासा पालिकेने दिला असून आता तरी पालिकेचे शुल्क ते भरतील आणि परवानगी घेतील अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे . तर एकीकडे पालिका कर्ज वाढले म्हणून कर - दरवाढ करत असताना टर्फ चालकांवर इतकी मेहेरबानी दाखवल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .