मीरा भाईंदर पालिकेने ५ रस्त्यांवर सुरू केले पे अँड पार्क
By धीरज परब | Published: March 2, 2024 07:22 PM2024-03-02T19:22:43+5:302024-03-02T19:22:59+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील रस्त्यांवर १५ ठिकाणी मंजूर केलेल्या पे अँड पार्क पैकी ५ रस्त्यांवर पे अँड पार्क ...
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील रस्त्यांवर १५ ठिकाणी मंजूर केलेल्या पे अँड पार्क पैकी ५ रस्त्यांवर पे अँड पार्क १ मार्च पासून सुरु केले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या नागरिकांना आता वाहतूक पोलीस वाहन उचलून नेण्याची भीती राहणार नसली तरी त्यासाठी पार्किंग शुल्क भरावे लागणार आहे.
शहरातील रस्ते - पदपथ व मुख्य वर्दळीची ठिकाणं आधीच फेरीवाले - हातगाडी वाले, अनेक दुकानदार आदींनी व्यापली असून नागरिकांना मोकळेपणाने व सुरक्षित चालण्यास जागा नाही. त्यातच रस्त्यांवर वाहनांची पार्किंग केली जाते कारण पालिकेनी पुरेसे वाहनतळ उपलब्ध केलेले नाहीत.
शहरातील पार्किंग समस्या गंभीर बनत चालली असताना महापालिकेने सध्या भाईंदर पश्चिम भागात एकमेव स्कायवॉक येथे १०६ दुचाकी चे तर मीरारोडच्या कनकिया येथील स्टार मार्केट मागे वाहनतळ आरक्षण इमारतीत ६६ चारचाकी आणि मीरारोड रेल्वे स्थानक जवळ वाहनतळ आरक्षणात १ हजार ३४६ दुचाकी वाहनांचे पे अँड पार्क आहे.
शहरात केवळ ३ वाहनतळ असून महापालिकेने शहरातील रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या लोकां कडून शुल्क आकारून उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी १५ रस्त्यांवर पे अँड पार्क सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली होती . ह्या १५ वाहनतळां मध्ये २ हजार ८८३ चारचाकी तर ५ हजार ९४३ दुचाकी वाहने उभी राहण्याची क्षमता आहे.
त्यापैकी ५ रस्त्यांवर पालिकेने १ मार्च पासून पे अँड पार्क सुरु केले आहे. त्याचा ठेका नाशिकच्या भालवी ग्रुप ठेकेदारास मिळाला आहे. मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटर ते अस्मिता गार्डन व भक्ती वेदांत पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ३८ ठिकाणी शीतल नगर नाका ते मीरारोड रेल्वे स्थानक व मासळी मार्केट पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने ११ ठिकाणी. मीरारोड स्थानक ते जॉगर्स पार्क रस्त्याच्या दोन्ही बाजूला ६ ठिकाणी व नया नगर रेल्वे समांतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पे अँड पार्क सुरु केले आहे.
भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानक मार्ग बालाजी नगर चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला २ ठिकाणी पे अँड पार्क सुरु करण्यात आले आहे. महापालिकेने तश्या आशयाचे फलक लावले असून त्यावर पार्किंग शुल्क आणि वेळ सुद्धा नमूद केली आहे. शिवाय पालिकेने शहरात आणखी ३४ नवीन वाहनतळ प्रस्तावित केली असून त्याला वाहतूक पोलीस आदीं कडून मंजुरी मिळाल्यानंतर ती सुरु होण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर पे अँड पार्कचे १८ टक्के जीएसटी सह दर
६ तासांसाठी १२ तासांसाठी २४ तासांसाठी मासिक पास
सायकल ४ रुपये ६ रुपये १२ रुपये १७७ रुपये
दुचाकी १८ रुपये २४ रुपये ३० रुपये ४१३ रुपये
कार ५९ रुपये ८९ रुपये ११८ रुपये १ हजार १८० रुपये
व्यावसायिक वाहने
दुचाकी / तीनचाकी , टेम्पो ७१ रुपये ११८ रुपये १७७ रुपये २ हजार ३६० रुपये
बस , ट्रक आदी जड वाहने ८३ रुपये १४८ रुपये २०७ रुपये ४ हजार ७२० रुपये