मीरा-भाईंदरला फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 02:37 PM2021-06-18T14:37:56+5:302021-06-18T14:38:06+5:30

 महापालिका प्रशासनासह नगरसेवक -  राजकारणी मात्र चिडीचूप 

Mira-Bhayander to the peddler's encroachment; Fear of increasing corona infection | मीरा-भाईंदरला फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

मीरा-भाईंदरला फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

Next

मीरा रोड: कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे निर्बंध शिथिल होत नाही तोच मीरा भाईंदर मधील रस्ते पदपथांवर फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. जेणे करून गर्दी उसळत असून अनेकजण मास्क न घालताच वावरत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.  नागरिकांना चालणे त्रासाचे झाले असून वाहतुकीची कोंडी होत आहे. परंतु महापालिका प्रशासनासह नगरसेवक मात्र या गंभीर बाबीकडे डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे.

मीरा-भाईंदर शहरातील गल्लीबोळात पासून मुख्य रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. दिवसेंदिवस शहरातील फेरीवाल्यांची संख्या सपाट्याने वाढलेली आहे. महापालिकेच्या ना फेरीवाला क्षेत्रात तर पालिकेच्या नाकावर टिच्चून सर्रास फेरीवाले रस्ता पदपथ अडवून बसलेले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक बाहेरील परिसरात १५० मीटर तर रुग्णालय, शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळ पासून १०० मीटर अंतराच्या परिक्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केलेली आहे. फेरीवाल्यांनी रस्ते पदपथ व्यापल्या ने सर्वसामान्य नागरिकांना रहदारीला प्रचंड अडथळा येतो व फेरीवाल्यांच्या त्रास सहन करावा लागतो. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून मात्र रस्ते - पदपथ व्यापून बसलेल्या या फेरीवाल्यांना पाठीशी घातले जाते. महापालिकेचे फेरीवाला पथक तसेच प्रभाग अधिकारी आदींकडून सुद्धा फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नाही. नगरसेवक, राजकारणी  ह्या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेत नाहीत. बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदाराची वसुली मात्र फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येनुसार झपाट्याने वाढत आहे. फेरीवाल्यांना पाठीशी घालण्यामागे हप्तेखोरी हे सर्वात मोठे कारण असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग सध्या काही प्रमाणात कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु त्यामुळे शहरातील रस्ते - पदपथ हे पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कोरुना संसर्ग पसरू नये म्हणून मास्क घालणे, गर्दी टाळणे आधी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यकता असताना त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. 

अनेक फेरीवाले मास्क न घालताच व्यवसाय करत आहेत. शिवाय फेरीवाल्यांची आणि ग्राहकांची खरेदीसाठी होत असलेली प्रचंड गर्दी पाहता कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती यानिमित्ताने व्यक्त होत आहे.  फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणे जिकरीचे बनले असून वाहतुकीची कोंडी वाढून ध्वनी व वायू प्रदूषण वाढले आहे. 

Web Title: Mira-Bhayander to the peddler's encroachment; Fear of increasing corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.